कालव्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

गोदावरी नदीच्या डाव्या कालव्यात पोहत असताना तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी वाजेदरम्यान मखमलाबाद रोड परिसरात समर्थनगर येथे घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अश्वमेधनगर, पंचवटी येथील प्रमोद बबन जाधव (वय १३), सिद्धेश अंबादास धोत्रे, निलेश काशीनाथ मुळे (वय १३) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी वेगाने जात आहे. मंगळवारी दुपारी पाच मुले पोहोण्यासाठी कालव्याजवळ आले. सर्वजण कपडे काढून पाण्यात उतरले. त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांनी तीन मुले पाण्यात बुडाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यानुसार नागरिकांनी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी अग्निशमन दलास संपर्क साधत तीन मुले पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांना पाण्याबाहेर काढत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिघांना मृत घोषित केले.