घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसप्तशृंग गडावर देवीच्या गाभार्‍यात तीनशे किलो द्राक्षांची आरास

सप्तशृंग गडावर देवीच्या गाभार्‍यात तीनशे किलो द्राक्षांची आरास

Subscribe

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर देवीच्या गाभार्‍यात मराठी नववर्षानिमित्त अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीनशे किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती. गुढीपाडव्यानिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या आरतीपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शुभमुहूर्त साधत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस गुढीपाडव्याला सुरू होतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. सप्तशृंगगडावर सकाळपासूनच मंगलमय वातावरण होते. बुधवारी (दि.२२) पंचामृत महापूजा नाशिक येथील देवीभक्त सुधीर सोनवणे यांच्या हस्ते झाली.

- Advertisement -

सप्तश्रृंगी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी फुलांची व द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नाशिक येथील देणगीदार भाविक अ‍ॅड. अनमोल चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत ३०० किलो द्राक्षांची सजावट करण्यात आली. तर, मुंबई येथील देवीभक्त विमल पवार यांनी फुलांची सजावट केली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण दिसून आले.

विशेष म्हणजे बुधवारी देवीला भरजरीची गुलाबी रंगाचे महावस्त्र नेसविण्यात आलेले आहे. तसेच, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त देवीला चांदीचा मुकूट, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कुयरी हार, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, सोन्याची नथ, सोन्याची कर्णफुले, चांदीचा कमरपट्टा, चांदीच्या पादुका इ. आभूषणे परिधान करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -