Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर पालघर विरारमध्ये रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू, अपघातात चिमुकल्याचा समावेश

विरारमध्ये रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू, अपघातात चिमुकल्याचा समावेश

Subscribe

गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांमध्ये पुन्हा वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. विरार रेल्वे स्थानकात देखील एकाच कुटुंबातील तिघांना रेल्वेची धडक बसल्याने या अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रेल्वे स्थानकांवरील रूळ नागरिकांनी ओलांडू नये, तसेच यासाठी रेल्वे स्थानकांवर असलेल्या पुलांचा वापर करण्यात यावा, अशा सुचना नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येत असतात. परंतु, याचे गांभीर्य लक्षात न घेता नागरिकांकडून वारंवार अशा चूका करण्यात येतात, ज्यामुळे त्यांना रेल्वे अपघातामध्ये प्राण गमवावे लागते. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना विरार रेल्वे स्थानकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार रेल्वे स्थानकामध्ये गुरुवारी रात्री उशिरा रेल्वे रुळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका तीन महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. गुरुवारी साडेबारा-एकचा दरम्यान विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचच्या दरम्यान नवरा-बायको आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला.

- Advertisement -

प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचच्या दरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना, भरधाव वेगात आलेल्या एका मेल गाडीने धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यामध्ये २८ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला आणि एका तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. तिघेही बिहारचे रहिवाशी असून ते मजूर असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर तिघांची ओळख पटवून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

दरम्यान, काल गुरूवारी (ता. २३ मार्च) मुंबईच्या जवळ असलेल्या आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. रेल्वे रुळ ओलांडताना कसाऱ्यावरून आलेल्या लोकल ट्रेनची धडक महिलेला बसली. त्यात तिचा मृत्यू झाला. सीताबाई पांढरे असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सांगण्यात आले. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या 10:55 च्या N 14 नंबरच्या लोकल ट्रेनने या महिलेला धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती.


- Advertisement -

हेही वाचा – राज्यात कायदा सुव्यस्था राखण्यास सरकार अपयशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

- Advertisment -