बारावी परीक्षेतील गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

राज्यात सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये रोज काही ना काही घडत आहे. अशातच गणिताच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य शिक्षण मंडळात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात आता मुंबई कनेक्शन समोर आले आहे.

Three Mumbai students charged in 12th examination mathematics paper leak case

बारावी बोर्डाच्या गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणामुळे राज्य शिक्षण मंडळ गोत्यात सापडले आहे. बारावीच्या गणिताच्या प्रशपत्रिकेची दोन पान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालूक्यातील परीक्षा केंद्रांवरून व्हायरल झाली होती. गणिताचा पेपर सुरु होण्याआधी ह्या पेपरमधील दोन पान ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील माजी शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्यामुळे एकच गदारोळ माजला. पण गणिताचा पेपर फुटला नसल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात आला होता.

परंतु आता या पेपरफुटीचे कनेक्शन हे मुंबईत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, मुंबईतील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये या पेपरचा काही भाग आढळून आला आहे. परीक्षा केंद्रावरच पोलिसांनी या विद्यार्थ्यांकडून त्याचा मोबाईल जप्त केला होता. या विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरच्या दिवशी १० वाजून १७ मिनिटांनी पेपरचा काही भाग मोबाईलमध्ये मिळाल्याचे या तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणाला नवे वळण लागले असून याचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. तर याचे मुंबई कनेक्शन कसे काय तयार झाले? याबाबतचा तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पेपर फुटीनंतर सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला हा गुन्हा साखरखेर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेला. शिक्षण मंडळाकडून याची तत्काळ दखल घेऊन विभागीय सचिव अमरावती उल्हास नरड यांनी पत्रक काढून सिंदखेड राजा तालुक्यातील केंद्र क्रमांक ६०१, ६०२, ६०६, ६०८ ६०९ या पाच परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक व रनर यांची तत्काळ बदली करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्यास सांगितले होते.

हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे सहा गुण मिळणार, पण…

दरम्यान, गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन शिक्षक देखील सहभागी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तर सिंदखेड राजा येथील ज्या केंद्रावर पेपरफुटी झाली त्या आजूबाजूच्या गावातील तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.