हिंगोली : धावत्या आटोतून तीन विद्यार्थिनींनी उडी मारल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली. या तीन विद्यार्थिनींपैकी पैकी एकीचा मृत्यू झाला असून दोघीजणी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना तालुक्यातील राहोली पाटी शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. विद्यार्थिनींनी रिक्षातून उड्या का मारल्या याची माहिती समोर आलेली नाही, मात्र पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून त्यानंतर नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. (Three students jump from a moving auto one died in accident)
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंगोलीत शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ऑटोतून नर्सीनाकडे जात होत्या. हिंगोली ते नर्सी ना. मार्गावरील राहोली पाटी शिवारात ऑटो आली असता यातील एका विद्यार्थीनीने धावत्या ऑटोतून उडी मारली. त्यामुळे घाबरलेल्या अन्य दोघींनीही उडी मारली. यात तिघी जणीही गंभीर जखमी झाल्या असून एकीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिघींनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, यातील एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमीपैकी एकीला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
फिरोजपूरमध्ये आयशर आणि गाडीचा भीषण अपघात
गाडी आणि आयशरच्या झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जखमी 11 जणांपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंजाबमधील फिरोजपूर-फाजिल्का मार्गावरील मोहन गावाच्या उताडजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अत्यंत भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीने आयशरला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचे समजते. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातानंतर गाडीतील प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी गाडीतून 25 हून अधिक जण प्रवास करत होते. जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर सर्व जखमींवर जिल्हा प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. अपघाताच्या तपासासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच रोड सेफ्टी फोर्स (एसएसएफ) टीम घटनास्थळी पोहोचली होती. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.