अलिबाग : अलिबाग शहराजवळ असणाऱ्या चेंढरे बाह्यवळण येथे खांद्यावर फकीराची झोळी, डोक्याला रुमाल बांधलेल्या तिघांना अलिबागकरांनी सतर्कता दाखवत पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रह, नक्षत्र आणि राशी चक्राच्या अंगठ्यांचा बॉक्स, खोटे आधार ओळखपत्र बाळगून जनतेची दिशाभूल करीत फिरणाऱ्या या तिघांवर नागरिकांचा संशय बळावल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या तिघांच्या हालचालींवर नागरिकांनी करडी नजर ठेवून त्यांना घेरले. ज्यानंतर काही नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांचे तरुणांना उत्तर देता आले नाही. यामुळे नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आणि संशयित तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अलिबाग पोलीस ठाण्यात या तरुणांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Three suspects who came to sell rings in Alibaug were handed over to the police)
हेही वाचा – खटकी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी; तिघांची पोलीस करणार 2 दिवस कसून चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरातील चेंढरे बायपास परिसरात फकिराच्या वेशात येऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तीन तरुण करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे त्या तिन्ही तरुणांना नागरिकांनी हटकले. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार अलिबाग बायपास येथे घडण्याअगोदर हे तीन संशयित तरुण चोंढी परिसरात फकिराच्या वेशात जाऊन आपले काम करत असताना तेथे देखील नागरिकांनी त्यांना हटकले होते. त्यावेळी या तिघांमधील दाढी असणारा संशयित तेथून पळून गेला. चेंढरे बायपास येथे आपल्या बोलबच्चनने या तरुणांनी आपल्या जवळील अंगठी विकण्यासाठीचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. हे तरुण फकिराच्या वेशात नागरिकांना फसविण्यासाठी आले आहेत, याचा अंदाज काही नागरिकांना आला. त्यांनी लगेचच या तरुणांची उलट तपासणी सुरु केली. त्यांच्याकडे असणारे साहित्य त्यांच्या झोळीतून बाहेर काढले असता यामध्ये ग्रह, नक्षत्र आणि राशिचक्राच्या अंगठ्यांचा साठा आढळला. त्यांना त्यांची ओळख विचारली असता त्यांनी आम्ही गुजरात येथून आलो असल्याचे नागरिकांना सांगितले.
यानंतर त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले असता आणि नावे विचारली असता त्यांनी सांगितलेली नावे आणि त्यांच्याकडे असणाऱ्या आधार कार्डमध्ये असलेल्या नावांमध्ये विसंगती आढळून आली. यामुळे नागरिकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क केला. पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी धाव घेतया तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना तेथेच काही प्रश्न विचारले असता त्या तरुणांनी आमचे सहकारी माणगाव येथे आहेत, असे सांगितले. याबाबत अधिक माहिती घेतली असता संतोषभाई शिवा सलाट (वय 35 वर्षे, गुजरात), संजय शिवाभाई सलाट (वय 18 वर्षे, गुजरात) आणि पप्पू धनाभाई सलाट (वय 17 वर्षे, गुजरात) हे तिघेजण बडोदा येथून दहा दिवसांपूर्वी ऐरणाकुरम एक्सप्रेसने पनवेल येथे कुटुंबासहित आले असून ते काही दिवस पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागी राहिले होते. नंतर ते माणगाव येथे आले आणि त्यांनी त्यांचे बस्तान माणगाव येथील नदीकिनारी बसवले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.