मुंबई – मुंबईतील शिवडी कोळीवाडा येथे घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. मुलगा सापडत नसल्याने सैरभैर झालेल्या पालकांनी अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तीन वर्षांच्या चिमुकल्याचा शोध सुरु असतानाच वडाळा पोलिसात एक महिला मुलगा सापडल्याचे सांगते. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिच्या साथीदारांनी मुलाचे अपहरण केले आणि त्याची विक्री करण्याचा त्यांचा इरादा होता. योग्य ग्राहक वेळेवर न सापडल्यामुळे अखेर मुलाला पोलिसांकडे सोडून पसार होण्याचा टोळीचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयित महिलाच मुले पळवणाऱ्या टोळीची सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
शिवडी कोळीवाडा येथे चिमुकला घरासमोरील मोकळ्या मैदानात खेळत असताना अज्ञात व्यक्ती चिमुकल्याला घेऊन गायब झाली होता. मुलगा हरवला हे समजताच मुलाच्या आई-वडिलांनी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मुलाचा शोध सुरू असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मुलाला वडाळा पोलीस ठाण्यात आणून जमा केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्यांनी सांगितले की, सानिका नावाच्या परिचित महिलेला हे मुल सापडले होते आणि वडाळा पोलीस ठाण्यात जमा करण्याकरिता ती त्याला घेऊन जात होती.
सानिकाला पोलीस ठाण्यात बोलवल्यानंतर चौकशी दरम्यान दोन व्यक्तींनी गुन्ह्याची कबुली दिली. सानिका या मुलाला कल्याणमध्ये विक्री करण्याकरिता घेऊन गेली होती. मात्र तिकडे विक्री झाली नसल्यामुळे त्याला घेऊन ती परत येत होती.
चौकशीअंती या गुन्ह्यात सानिका वाघमारे (18) तिचा साथीदार पवन पोखरकर (२०) राजेंद्र बोंबले यांना अटक करण्यात आली आहे. याआधी या टोळीने किती मुलांचे अपहरण करुन विक्री केली, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन
मुलांना एकटे खेळायला सोडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवणे सध्या धोक्याचे झाले आहे, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : चिंता नको, बेस्टकडे 3 हजार 337 बसगाड्या राहणारच! BMC आयुक्तांचे आश्वासन