आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष ठेवा! तीन वर्षीय ‘गाथा’चा शोष खड्ड्यात पडून मृत्यू

ही मुलगी खेळता खेळता शोष खड्ड्यापर्यंत गेली आणि पाण्यात पडली, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शौचालयासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यात पडून एका तीन वर्षीय चुमकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही मुलगी खेळता खेळता शोष खड्ड्यापर्यंत गेली आणि पाण्यात पडली, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. (Three year old girl died by falling in toilet drain)

हेही वाचा – भिवंडीत मलनि:स्सारण उदंचन केंद्राच्या खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

पुण्यातील चाकण येथील कोरेगाव खुर्द माळवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. शौचालय बांधण्यासाठी नितन कडूसकर कुटुंबियांनी हा शोष खड्डा बांधला होता. मात्र, तुफान पाऊस असल्याने शौचालयाचे काम अर्धवट राहिले. तसेच, खड्ड्यात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणीही साचले होते. गाथा नावाची तीन वर्षीय चिमुकली घरात कागदासोबत खेळत होती. खेळता खेळता शोष खड्ड्याजवळ गेली आणि तिथेच पडली. बराच वेळ ती दिसली नाही म्हणून घरातल्यांनी शोधा-शोध केल्यानंतर शोष खड्ड्यात तो कागद तरंगताना दिसला. त्यामुळे अंदाज लावत खड्ड्यात चिमुकलीचा शोध घेतला असता ती तिथे सापडली. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

गाथा ही कडूसकर यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या अशा जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.