Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'वेळकाढूपणा'..., जालना लाठीमार प्रकरणातील भाजपाच्या शिष्टाईवर ठाकरे गटाचे ताशेरे

‘वेळकाढूपणा’…, जालना लाठीमार प्रकरणातील भाजपाच्या शिष्टाईवर ठाकरे गटाचे ताशेरे

Subscribe

मुंबई : जालन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जनरल डायर’ची उपमा दिली. त्यापाठोपाठ, जालना लाठीमार प्रकरणातील भाजपा नेत्यांच्या शिष्टाई म्हणजे ‘वेळकाढूपणा’ असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. शिवाय, विविध पक्षांचे नेते घटनास्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. तसेच, संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत.

हेही वाचा – ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांना मराठवाडा बंदी करा; राज ठाकरेंचे आंदोलकांना आवाहन

- Advertisement -

जालन्यातील लाठीमार प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

यादरम्यान, सरकारच्या वतीने राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार नितेश राणे यांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन दिवसांत आरक्षण द्या, तरच उपोषण मागे घेऊ, असा ठाम पवित्रा जरांगे यांनी घेतला. त्यावर दोन दिवसांत आरक्षण शक्य नसल्याचे सांगत महाजन यांनी एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यामुळे हा तिढा कायम राहिला आहे.

हेही वाचा – …म्हणून शांततेने सुरू असलेले मराठा आंदोलन चिरडण्याचा निर्णय, ठाकरे गटाचा थेट आरोप

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टिप्पणी केली आहे. ‘जिथे इच्छा तिथे मार्ग. जिथे इच्छा नसते तिथे समिती, उपसमिती, अहवाल आणि निष्कर्ष…’ असे भाजपाचे नेते नितीन गडकरी कायम आणि देवेंद्र फडणवीस अधूनमधून बोलत असतात. काल, रविवारी गिरीश महाजन आणि बाकीचे भाजपानेते आंदोलकांना भेटल्यावर त्यात एक शब्द अजून जोडायला हवा. तो म्हणजे ‘टाइमपास’ किंवा ‘वेळकाढूपणा’, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -