Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी 'या' नियमांचे पालन करावेच लागणार

तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी ‘या’ नियमांचे पालन करावेच लागणार

Subscribe

तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत. मंदिराच्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीनुसार तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेले आणि राज्याची कुलस्वामिनी आई म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत. मंदिराच्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या नियमावलीनुसार तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे मंदिरात लावण्यात आलेल्या फलकांवर लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा – Vastu Tips : आर्थिक नुकसान करणारी ही झाडे तुमच्याही घरात आहेत का?

- Advertisement -

“अंग प्रदर्शक, उत्तेजक. असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा” अशा आशयाचे फलक मंदिर परिसरात मंदिर संस्थानाकडून लावण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिर संस्थानच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अंमलबजावणी आज गुरुवारपासून सुरु झाली आहे. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाकडून सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त महिलांनाच हा नियम लागू न करता पुरूषांना सुद्धा कपड्यांच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.

तुळजाभवानी मंदिराव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील गुना येथील जैन मंदिरात प्रवेशाचा नियम आहे. येथे पाश्चात्य कपडे परिधान करून कोणतीही महिला किंवा मुलगी प्रवेश करू शकत नाही. माँ कामाख्याच्या मंदिरामध्ये देखील कपड्यांसाठी नियम आहेत. तसेच केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिरात महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील ड्रेस कोड आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे. स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो. त्यामुळे या देवस्थानाला एक वेगळीच मान्यता आहे. त्यामुळे या मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी कपड्यांच्याबाबतीतला निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -