घरमहाराष्ट्रबावधानला वन्यजीव उपचार केंद्र आणि अनाथालय

बावधानला वन्यजीव उपचार केंद्र आणि अनाथालय

Subscribe

जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे जंगलाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर वाहनांची धडक लागून जखमी होणार्‍या वन्यजीवांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जखमी वन्यजीवांवर तातडीने उपचाराची गरज असते. त्यासाठी बावधान खुर्द येथे उपचार केंद्र आणि अनाथालय उभारण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्याला राज्य मंत्रीमंडळानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे जखमी वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे.

पुणे जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य आहे. या अभयारण्यात शेकरू, बिबट्या, वानर, माकड, कोल्हा, लांडगा, हरिण, काळवीट आदी वन्य प्राणी आढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षीही आढळून येतात. हे वन्यजीव रात्रीच्या वेळी अचानक हायवेवर येतात. त्यामुळे अपघातात जखमी होत असतात. तसेच ते आजारीही पडत असल्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज असते. हे उपचार वेळीच मिळाले नाहीत तर ते दगावू शकतात. मागील काही महिन्यांमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वन्यजीवांची संख्या वाढली आहे.

- Advertisement -

पुण्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालयात प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात माणिकडोह येथे बिबट्या निवारण केंद्र आहे. याठिकाणी जखमी बिबट्यावर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे त्यांचे संगोपनही केले जाते.

प्राणी संग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. मात्र, वन विभागाने स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून वन्यजीव उपचार केंद्र स्थापन करण्याचा शासनाकडे पडून होता. अखेर मंत्रिमंडळाकडून त्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे उशीराका होईना बावधान परिसरात नवीन वन्यजीव उपचार केंद्र सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -