कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

बहुचर्चित अशा पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज (ता. २४ फेब्रुवारी) आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता निवडणूक प्रचारांची सांगता होणार आहे. त्यामुळे आज राजकीय पक्षातील सर्वच महत्वाचे नेते आपल्या उमेदवारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतणार आहेत.

Today is the last day of campaigning for Kasba Peth and Chinchwad by-elections

गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज शांत होणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना आपला प्रचार करता येणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात दाखल होणार आहेत. कसबा पेठ निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज या निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. यानंतर २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसबा पेठेचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी महात्मा फुले वाड्यापासून रोड शोला सुरुवात करणार आहेत. दुपारी एक वाजता या रोड शोला सुरुवात होणार आहे. तर उपमुख्यमंत्री यांची देखील हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पदयात्रा निघणार असल्याचे बोलले जात आहे. तर चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सभा घेणार आहेत.

हेही वाचा – पुण्यातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या विरोधात; ५० पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

कसबा पेठ विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे रोड शो करत प्रचार करणार आहेत. तर चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रोड शो करणार आहेत. दरम्यान, इतर नेतेही आपापल्या उमेदवारांचा आज जोरदार प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी (ता. २३ फेब्रुवारी) डेक्कन नदीपात्रात संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभा घेणार होते. पण भाजपकडून ही सभा अचानक रद्द करण्यात आली. सभा अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, आज कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सर्वच राजकीय पक्षांकडून रोड शोने सांगता करण्यात येणार आहे.