Maharashtra SSC Exams 2022: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार

दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक आणि महिलांचे विशेष पथक तैनात केले आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांनंतर दहावी बोर्डच्या ऑफलाईन परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे महामारीमुळे अचानक दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. पण दोन वर्षानंतर आता दहावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आजपासून घेतली जाणार आहे. यासाठी खास उपाययोजना केल्या आहेत. यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदण केली आहे. दरम्यान लिहिण्याचा सराव सुटल्याने विद्यार्थ्यांना वाढवी वेळ देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा आज सुरू होत आहे. कोरोनाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर तासभर आधी उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. यावर्षी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेला बसणार आहे. 22 हजार 911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. राज्यातील एकूण 21 हजार 284 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला आहे. 70 ते 100 गुणांच्या पेपरला 30 मिनिटे वाढीव वेळ, तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक आणि महिलांचे विशेष पथक तैनात केले आहे. तसेच विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी याबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राचे चित्रीकरण होणार आहे.

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक

15 मार्च – प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च – द्वितीय किंवा तृतीय भाषा
19 मार्च – इंग्रजी
21 मार्च – हिंदी (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च – गणित भाग – 1
26 मार्च – गणित भाग 2
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 2


हेही वाचा – राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा