Inflation : टोमॅटोने पुन्हा भाव खाल्ला, तुमच्या शहरात काय दर ?

Tomato Benefits

थंडीच्या काळात एरव्ही गणतीतही नसणारा टोमॅटो सध्याच्या चालू हंगामात चांगलाच भाव खातोय. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव हा सरासरी १५० रूपयांवर पोहचला आहे. अनेक राज्यातील बड्या शहरांमध्ये दीडशे रूपयांहून अधिक पैसे एक किलो टोमॅटोसाठी मोजावे लागत आहेत. टोमॅटोच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातला टोमॅटो आता बघायलाही महागला आहे. परिणामी सर्वसामान्यांना टोमॅटो परवडत नसल्याची स्थिती आहे. लोकांच्या रोजच्या बजेटमध्ये टोमॅटो महागला आहे. एरव्ही हिवाळ्यात टोमॅटो २० रूपये किलो असतो, पण यंदाच्या हंगामात मात्र १५० रूपयांपर्यंत टोमॅटोचे दर वाढले आहेत.

चेन्नईत टोमॅटोला सर्वाधिक भाव

चेन्नईत टोमॅटो १६० रूपये किलोने विकला जात आहे. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये आलेल्या पूराचा फटका म्हणजे टोमॅटोच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचाच फटका हा मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या किंमती वाढण्यावर झाला आहे. बंगळुरूत टोमॅटोची किंमत ११० रूपये प्रति किलो इतकी आहे. तर मुंबईत टोमॅटोची किंमती ८० रूपये प्रति किलो इतकी आहे. राजधानी दिल्लीत टोमॅटोची किंमत ६० रूपये ते ९० रूपयांवर पोहचली आहे. टोमॅटोसोबतच कांद्याच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिल्ली मुंबईत टोमॅटोला ६० रूपये प्रति किलो इतका भाव मिळाला आहे.

का महागले टोमॅटो ?

टोमॅटोच्या बाबतीत कमी झालेली लागवड आणि मोठी मागणी हेच कारण टोमॅटोच्या भाववाढीसाठी कारणीभूत आहे. त्यासोबतच टोमॅटोची वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या दरामध्ये झालेली वाढ पाहता टोमॅटोची किंमत सातत्याने वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर हेदेखील टोमॅटोच्या दरवाढीचे एक कारण म्हणून समोर आले आहे. त्याचाच परिणाम हा भाज्यांच्या किंमती वाढण्यावरही होत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे एपवर आधारीत स्टार्ट अप्सच्या माध्यमातूनही टोमॅटो हे १२० रूपये दराने विक्री केले जात आहेत.

आंध्र – कर्नाटकातील पावसाचा परिणाम

आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात सतत होणाऱ्या पावसाचा परिणाम हा पिकांची लागवड असलेल्या भागातही झाला आहे. त्यामुळेच टोमॅटोच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे अतिवृष्टीने नुकसान होण्याआधी २७ किलो टोमॅटो ५०० रूपयांमध्ये खरेदी केला जायचा. आता हीच किंमत ३ हजार रूपयांवर पोहचली आहे. टोमॅटोचे दर इतक्या पातळीवर याआधी कधीच गेले नव्हते.