दर कोसळल्याने टोमॅटो फेकला रस्त्यावर; मार्केट यार्डसमोर झाला ‘लाल चिखल’

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्ह्यातील दिंडोरी, कळवणसह इतर भागातील शेतकर्‍यांनी टोमॅटो विक्री करता आणला होता. निर्यातक्षम टोमॅटोला प्रतिकिलो चार रुपयांपर्यंत तर, लाल टोमॅटोला प्रति जाळी २० ते ६० रुपये भाव मिळाल्याने गुरुवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बाजार समितीच्या गेटवर टोमॅटो रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांनी आंदोलन केले.

लाखो रुपये खर्च करून टोमॅटो लागवड केली असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप आहे. नाशिक बाजार समितीतून गुजरात, पंजाब, राजस्थान, बंगळुरू, दिल्लीसह इतर राज्यात शेतीमाल जात असतो. तेथून येणारी मागणी घटल्याने आता तिकडेही शेतीमाल जाणे बंद झाल्याने व बाजार समिती आवारात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. निर्यातक्षम टोमॅटोला प्रती किलो ४ रुपयांपर्यंत भाव आला आहे. अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या संकटातून टोमॅटो पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी मेहनत घेतली. त्यातच आता कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटो लाल होऊ लागल्याने बाजारात आवक वाढली आहे. परंतु, दरात कोणतीही सुधारणा नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.

यावेळी जिल्ह्यातील काही टोमॅटो उत्पादकांनी व्यथा मांडली. गेल्या आठवड्यात टोमॅटोला एका जाळीसाठी १५० ते १७० रुपये दर होता. चार दिवसांपूर्वी तो १०० वर आला. आज शेतापासून बाजार समितीपर्यंत माल आणण्यासाठी ५५ ते ६० रुपये खर्च येतो. व्यापार्‍यांनी प्रती किलो चार रुपये दराने माल देण्यास सांगितले. इतक्या कमी भावात माल आणण्याचा खर्चही निघत नाही. पुन्हा घरी नेण्यासाठी वेगळा खर्च. त्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकला, असे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे पेठरोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकर्‍यांशी संवाद साधत आंदोलकांची समजूत काढली व वाहतूक सुरळीत केली.

निगडोळ गावातील काही शेतकर्‍यांनी १२०० जाळ्या टोमॅटो आणला होता. एका जाळीत २० किलो टोमॅटो बसतात. सुरूवातीला व्यापार्‍याने माल पाहून चार रुपये प्रतिकिलो दर ठरवला. ४० जाळ्या उतरविल्यावर तीन रुपये दर ठरविला. त्यानंतर दोन रुपयाने मागणी केल्यावर फुकटच घे, असे सांगितल्यावर कोणीच जाळी उचलायला तयार झाले नाही. घरी नेण्यासाठीही पैसे जवळ नसल्याने रस्त्यावरच काही माल विकल्याचे त्यांनी सांगितले. : योगेश मालसाने, शेतकरी, निगडोळ

बाजार समितीच्या आवारात यावर्षी उन्हाळ्यात टोमॅटोची अवाक वाढल्याने तसेच इतर बाजारपेठत टोमॅटोची मागणी नाही. त्यामुळे व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करून काय करतील. शेत मालाला भाव न देण्यामागे व्यापार्‍यांचा कोणताही फायदा नाही. : संदीप पाटील, व्यापारी

बाजार समिती प्रशासनाला काहीच सोयरसुतक नाही 

बाजार समितीच्या आवारात जवळपास एक तास आंदोलन सुरु असतांना तिथे बाजार समितीचे प्रशासक किंवा वरिष्ठ अधिकारी शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी आले नाही. पोलिसांनी शेतकर्‍यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. नंतर रस्त्यावर फेकलेला टोमॅटो मजूरांच्या मदतीने टोपलीच्या साहाय्याने भरून घेत घंटागाडीत टाकून रस्ता मोकळा करण्याचे काम बाजार समितीकडून करण्यात आले.