Maharashtra Lockdown: राज्यात बुधवारी नवे कोरोना प्रतिबंधक निर्बंध जाहीर होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या होकारनंतर उद्या, बुधवारी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी नवे निर्बंध जाहीर करू अशी माहिती अजित पवारांनी दिली.

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून १० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थिती उद्या, बुधवारी सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील नव्या निर्बंधाबाबत चर्चा केली जाऊ हे निर्बंध उद्याच सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर करणार आहे, अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमवीर उद्या सकाळी ९ वाजता माझ्या चेंबरला मी स्वतः, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, चीफ सेक्रेटरी, सार्वजनिक आयुक्त, फायनास सेक्टरी अशी बैठकी लावली आहे. कारण आजच्या चर्चेमध्ये काही गोष्टी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयुक्त, टास्कफोर्सचे आमचे काही सहकारी, डॉक्टर्स यांनी काही गोष्टी निर्दशनास आणून दिल्या की, दुसऱ्या लाटेदरम्यान काही ऑर्डर निघाल्या होत्या त्याची अंमलबजावणी करताना जिल्ह्यातल्या यंत्रणेला सोप्प जात होत. त्यामुळे एकच ऑर्डर निघाली तर फार बरे होईल असे आमच्या लक्षात त्यांनी आणून दिले. त्याच्यामुळे उद्याच बैठकीला बसतोय.

‘उद्याच्या बैठकीमध्ये चर्चा करून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या जातील. मला आजपर्यंतचा अनुभव आहे की, मुख्यमंत्री राज्याच्या जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील, तर त्याला ताबडतोब होकार देतात. मग आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांच्या होकार आल्यानंतर तशाप्रकारच्या ऑर्डर उद्या राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये दिल्या जातील,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली.


हेही वाचा – School Closed: मुंबई, ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय