मुंबई : टोरेस कंपनीकडून 13 हजारहून अधिक कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. मुंबईसह आसपासच्या अनेकांनी या टोरेस कंपनीत आपले पैसे गुतवले होते. पण या कंपनीने नागरिकांना अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून आणखी तीन जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. भाईंदरमधील टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या तिघांना पोलीस स्टेशनला हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (torres scam thane police arrested three accused who work in bhayandar torres office)
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर येथील टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि ज्या वक्तीच्या नावाने ऑफिस भाड्यावर घेतले, त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी सुरेश यादव (23) राहणार ताडदेव फिश मार्केट, नितीन रमेश लखवानी (47) राहणार खारोडी मालाड आणि मोहम्मद मोईजुद्दीन नझरुद्दीन खालिद शेख (50) राहणार पूनम सागर मीरा रोड या तीन जणांना शुक्रवारी नवघर पोलिसांनी अटक केली.
टोरेस घोटाळा प्रकरणी एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असून ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करुन त्यांना ठाणे कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दादरच्या कंपनीत छापेमारी सुरूच
टोरेस कंपनीने गतवर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईतील दादरमध्ये पहिलं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर , गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड मध्ये देखील कार्यालयं उघडली होती. या सर्व कार्यलयांना पोलिसांनी टाळं ठोकलं असून त्या कार्यालयांवर छापेमारी केली जात आहे. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून दादरच्या टोरेस कंपनीत छापेमारी सुरु आहे. मुंबईतील सर्व दुकानांमधील मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेतला आहे. याआधी केलेल्या छापेमारी मध्ये पोलिसांना या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने तसेच 5 कोटी रुपये देखील मिळाल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली. आज आर्थिक गुन्हे शाखेकडून टॉरेस कार्यालयातील मुद्देमाल वस्तूंची जप्ती करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा – Raut vs Fadnavis : राऊतांकडून फडणवीसांचे गुणगान, पण मुख्यमंत्र्यांनी रिकाम टेकडे म्हणत फटकारलं!