क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपींची संख्या १६ ,चौघांना एनसीबी कोठडी

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात मागील दोन दिवसात ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ८ आरोपींपैकी चौघांना मंगळवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. चौघांना ११ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह आरोपींची संख्या १६ झाली असून ही संख्या वाढू शकते असे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, इशमीत सिंग आणि मनीष राजगारिया या चौघांना सोमवारी अटक करण्यात आली होती. या चौघांना मंगळवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींच्या वकिलाची आणि सरकारी वकिलाची बाजू ऐकून घेत चौघांना ११ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी एनसीबीने गोपाळजी आनंद, समीर सैगल, मानव सिंघल आणि भास्कर अरोरा या चौघांना अटक केली असून या चौघांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणात आर्यन खान याच्यासह आरोपीची संख्या १६ वर गेली असून आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेले चौघेजण क्रूझवर पार्टीचे आयोजन करणार्‍या कंपनीचे प्रतिनिधी असल्याची माहिती एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी अब्दुल कादर आणि श्रेयस नायक हे दोघे ड्रग्स सप्लायर असून उर्वरित दोघे हे क्रूझवर होते. अब्दुल कादर शेख याला जोगेश्वरी तर श्रेयस याला गोरेगाव येथून अटक करण्यात आली आहे.

या दोघांकडून कमी प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलेले आहे. मात्र, हे दोघे ड्रग्स सप्लायर असून आर्यनला या दोघांनी ड्रग्स पुरवठा केल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल कादिर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स आढळून आल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याची ओळख उघड होऊ नये म्हणून सरकारी वकिलाच्या विनंतीवरून त्याला पूर्णपणे चेहरा झाकून कोर्टात उभे करण्यात आले. त्यानंतर त्याला एका बाजूला कडक सुरक्षेत ठेवण्यात आले होते.

दरम्यान, एनसीबीने सोमवारी आणि मंगळवारी क्रूझमध्ये असलेल्या आरोपीच्या खोल्याची कसून तपासणी केली तसेच आयोजक कंपनीचे प्रतिनिधी यांच्या खोल्या तपासल्या. एनसीबीला ड्रग्स घेण्यासाठी लागणारे साहित्य आणि कमी प्रमाणात ड्रग्स देखील मिळून आला. शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा मोबाईल फोन एनसीबीने जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या ८ आरोपीची एनसीबी कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत आहे.