महाडमध्ये वाहतूक कोंडी

प्रवाशांचा जीव गुदमरला

दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चाललेल्या या शहरातील वाहतूक व्यवस्थादेखील दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुख्य रस्त्यांवर असलेल्या दुकानांसमोरील अवैध पार्किंग, दोन्ही दिशेला लागणारी वाहने आणि पोलिसांची पोकळ कारवाई यामुळे शहरातून जाणार्‍या एसटी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांच्या आडमुठेपणामुळे वाहने बाजूला केली जात नसल्याने अनेकदा बसगाड्या बराच वेळ एका जागी खोळंबलेल्या असतात.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालली आहे. यामुळे वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात इमारतींच्या पार्किंगचा प्रश्न कायम आहेच. रस्त्यावर लागणार्‍या विक्रेत्यांच्या गाड्या, दुकानासमोर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची थांबलेली वाहने यामुळे विविध रस्त्यावर कायमची वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असला तरी नगर पालिका प्रशासन आणि शहर वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. वाहतुकीबाबत अद्याप कोणताच मास्टर प्लान तयार केलेला दिसून येत नाही. मुख्य रस्त्यांवर होणार्‍या वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील काही रस्ते नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केले आहेत. याबाबत देखील ठोस कारवाई झाली नाही. याचा त्रास मात्र एसटी बसेसना अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सम-विषम वाहतूक पार्किंगबाबत निर्णय घेतला असला तरी याबाबत देखील ठोस कार्यवाही झालेली नाही.

शिवाजी चौक ते एसटी बस स्थानकापर्यंतच्या शिवाजी मार्गावर आपला बाजार, राजमाता जिजाऊ गार्डन, हॉटेल वेलकम, प्रांत कार्यालय कॉर्नर या भागात कायम वाहतूक कोंडी होते. या मार्गावर मुंबईहून येणार्‍या-जाणार्‍या बसेस, बिरवाडीसह पोलादपूर, किल्ले रायगड या मार्गावरील बसेस स्थानक ते शिवाजी चौक या दरम्यान कायम या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. यामुळे प्रवाशांना देखील त्रास होत असतो. अनेकदा एसटी चालकाला वादाला सामोरे जावे लागत आहे. हिच अवस्था प्रांत कार्यालय ते स्टेट बँक आणि पुढे महावीर कपड्याचे दुकान, बँक ऑफ बडोदा या परिसरातही उद्भवत असते. खाडीपट्ट्यात जाणार्‍या बसेसना देखील श्री वीरेश्वर मंदिर ते परांजपे विद्यालय परिसरात अडथळा निर्माण होत असतो. शाळा सुटल्यानंतर पालकांच्या वाहनांची गर्दी आणि दोन्ही बाजूने ये जा करणारे विद्यार्थी यामुळे ही वाहतूक कोंडी होते.