Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मालाड येथील वाहतूक कोंडी फुटणार; अडथळा ठरणारी 16 दुकाने पालिकेने हटवली

मालाड येथील वाहतूक कोंडी फुटणार; अडथळा ठरणारी 16 दुकाने पालिकेने हटवली

Subscribe

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड (पश्चिम) येथील एस. व्ही. रोडवर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) या रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणारी 16 दुकाने मंगळवारी तोडक कारवाई करून हटवली आहेत. त्यामुळे रस्ता पूर्वीपेक्षाही जास्त रुंद झाला असून या रोडवरील वाहतूक सुसाट होण्यास मोलाची मदत होणार आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये लोकवस्ती वाढत गेली त्याप्रमाणात वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने एकीकडे 12 हजार कोटी रुपयांचा ‘कोस्टल रोड’ (Coastal Road) हा प्रकल्प हाती घेऊन त्याचे 50 टक्केपेक्षाही जास्त काम युद्धपातळीवर करून मार्गी लावले आहे.

- Advertisement -

तसेच, पश्चिम उपनगरातील (Western Suburbs) एस. व्ही. रोड व इतर रोडवरील सार्वजनिक वाहनांसोबत खासगी वाहनांची गर्दी भरमसाठ वाढली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणही वाहतुकीला अडथळे ठरत आहेत. महापालिकेने पश्चिम उपनगरांतील रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी व वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कायम वर्दळीच्या असणाऱ्या एस. व्ही. रोडवरील (S V Road) मालाड (पश्चिम) येथील वाहतुकीची कोंडी आता दूर होणार आहे. कारण या मार्गावरील रामचंद्र लेन नाल्यानजीक दारुवाला कंपाऊंड येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी 16 दुकाने हटविण्याची कारवाई पी/उत्तर विभागाने मंगळवारी पार पाडली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

महापालिकेला, एस. व्ही. रोडवर रामचंद्र लेन नाल्यानजीक दारूवाला कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. नाल्यानजीक असणारी 16 दुकानांची बांधकामे तेथे अडथळा ठरत होती. त्यामुळेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पी/उत्तर विभागाकडून ही या दुकानांची बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण प्रस्तावित होते. या 16 व्यावसायिकांना जागेसाठीचा आर्थिक मोबदला महापालिकेकडून देऊन ही बांधकामे हटवावी व रस्ता रुंदीकरण करावे, असे आदेश उपआयुक्त (परिमंडळ 4) विश्वास शंकरवार यांनी दिले होते. त्यानुसार, सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी/उत्तर विभाग कार्यालयाने 8 अभियंते, 15 कामगार आणि एक जेसीबी संयंत्र यांच्या सहाय्याने ही 16 बांधकामे हटवण्याची कारवाई मंगळवारी पूर्ण केली. संबंधित दुकानमालकांना लवकरच आर्थिक मोबदला प्रदान करण्यात येईल; त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

- Advertisement -

रस्तारुंदीकरण होणार वेगात
महापालिकेने, एस. व्ही. रोड येथे 90 फूट रस्ता रूंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मंगळवारी व्यावसायिक दुकानदारांचा अडथळा हटवण्यात आल्याने रस्ते रूंदीकरणाचे काम वेगाने होण्यासाठी मदत होणार आहे. याठिकाणी आणखी काही बांधकामे हटवण्याची प्रक्रिया ही न्यायालयीन आदेशाच्या प्रतीक्षेत असून त्यासाठीची उचित कारवाई देखील आगामी काळात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -