घरमहाराष्ट्रपर्यटकांच्या आनंदावर वाहतूक कोंडीचे विरजण

पर्यटकांच्या आनंदावर वाहतूक कोंडीचे विरजण

Subscribe

मुंबईबाहेर जाणार्‍या महामार्गांवर वाहनांच्या रांगा

वीकेण्डला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्यास निघालेल्या पर्यटकांच्या आनंदावर शनिवारी वाहतूक कोंडीचे विरजण पडले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस वे आदींसह मुंबईबाहेर जाणार्‍या महामार्गांवर शनिवारी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची दमछाक झाली. शनिवारी सकाळी खालापूर टोलनजीक सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसून आल्या. त्याशिवाय वाशी टोल नाक्यावरही मुंबईबाहेर जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

- Advertisement -

पुण्याला जाणार्‍या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी लोणावळा बोगद्यातून मुंबईला जाणार्‍या मार्गिकेवरून काही वेळेसाठी वाहतूक वळवली. काही वेळेसाठी मुंबईला जाणारी वाहने थांबवण्यात येत असल्याने या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी दिसून आली. लोणावळ्याजवळ वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

केवळ पुण्याकडे जाणार्‍याच नव्हे, तर सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. पालघर, वसई-विरार, मुंबई, ठाणे येथून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले, परंतु यावेळी अनेक जण वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसत होते. वसईहून ठाणे, मुंबईकडे जाणारी वाहतूक, मुंबईहून गुजरात, ठाणेकडे जाणार्‍या मार्गिकेवर सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -