मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, परशुराम घाट बंद असल्याने कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

Traffic jam on Mumbai-Goa highway

राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. केंद्रीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीच्या इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आठ जुलैपर्यंत रेड अलर्ड जारी करण्यात आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे.यातच मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागल्या आहेत.

परशुराम घाट बंद असल्याचा फटका –

सुरक्षेच्या दृष्टीने नऊ जुलैपर्यंत परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस मार्गे सुरू असून परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

रत्नागिरीत २४ तासात १५४.८९ मिमी पाऊस –

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १५४.८९ मिमी पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरस्थिती नाही. मात्र, खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५५ मिमी पावसाची नोंद –

गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. कुठेही पूरस्थिती नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः, तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रायगडमध्ये एक एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.

 एनडीआरएफची पथके तैनात –

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय पालघर येथे एक, रायगड-महाड येथे दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दोन, कोल्हापूरमध्ये दोन, साताऱ्यात एक, सिंधुदुर्ग येथे एक अशी १३ पथके राज्यभरात तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबईत तीन, पुण्यात एक, नागपुरात एक अशा एकूण पाच एनडीआरएफच्या, तर धुळे येथे दोन, नागपुरात दोन अशा चार एसडीआरएफच्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात केल्या आहेत.