वाहतूक पोलिसांकडून सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी, मुंबईत बाईकस्वारांविरुद्ध कारवाई

bike

सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीची (helmet compulsory) गुरुवारपासून वाहतूक पोलिसांकडून अंमलबजावणी सुरु झाली. मुंबई शहरात (Mumbai City) दिवसभरात 6 हजार 271 बाईकस्वारासह (Bike Rider) सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून आगामी दिवसांत ही कारवाई अधिक कठोरपणे राबविली जाणार आहे. 25 मेला वाहतूक पोलिसांनी एका पत्रकाद्वारे 9 जूनपासून मुंबई शहरात बाईक चालविताना बाईकस्वारांसोबत सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीची (Helmet) घोषणा केली होती. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. बाईक चालविताना बाईकस्वारासह मागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट घातले नाहीतर त्यांच्यावर पाचशे रुपयांची दंडाची तसेच बाईकस्वाराचे तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द (License) करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

गुरुवारी 9 जूनपासून या कारवाईस वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली होती. दिवसभरात पोलिसांनी बाईकवरुन प्रवास करणार्‍या 2 हजार 334 चालक, 3 हजार 421 सहप्रवाशी आणि दोघांनी हेल्मेट घातले नाही अशा 516 जणांवर कारवाई केली होती. अशा प्रकारे गुरुवारी दिवसभरात 6 हजार 271 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर काही बाईकस्वाराचे तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याची कारवाई सुरु झाली आहे. या सर्वांविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 डी अन्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगण्यात आले.

विनाहेल्मेट बाईक चालविताना मुंबईसह इतर शहरातील अपघातात मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सर्वच बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती केली होती. हेल्मेट न घालणार्‍या बाईकस्वाराविरुद्ध वाहतूक पोलीस कारवाई करीत होते. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी बाईकवरुन प्रवास करणार्‍या सहप्रवाशांना हेल्मेट सक्ती केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले तर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहप्रवाशांच्या हेल्मेट सक्तीला भाजपाचा विरोध आहे.


हेही वाचा : दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक; वाहतूक विभागाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम