घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमदरशाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांची तस्करी; तब्बल, ५९ मुलांची सुखरूप सुटका

मदरशाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांची तस्करी; तब्बल, ५९ मुलांची सुखरूप सुटका

Subscribe

नाशिक : बिहार मधून महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मनमाड रेल्वे स्थानक येथून ३० तर भुसावळ स्थानक येथून २९ मुलांची सुटका करण्यात एका सामाजिक संस्थेसह  भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस भुसावळ यांना यश मिळाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ८ ते १५ वयोगटातील मुलांची मानवी तस्करी होत असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दानापूर-पुणे एक्सप्रेसने अल्पवयीन मुलांची मानवी तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस भुसावळ यांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्त कारवाई करत भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दाणापूर ते पुणे ही एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिस ठाण्यात आणले गेले.

- Advertisement -

त्यानंतर भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांडून पुन्हा मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. या रेल्वे गाडीत आणखी ३० मुले आणि ४ संशयित तस्कर मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आले. भुसावळ येथे मिळून आलेल्या २९ मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये पाठवण्यात आले असून मनमाड येथील ३० मुलांना नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.

मदरशाच्या नावाखाली तस्करी

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या 59 मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानक दरम्यान मंगळवारी (दि.३०) सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात तस्करी करणाऱ्या पाच जणांना गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -