नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, बोडके पालघरचे जिल्हाधिकारी

nasik municipal corporation

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने गेल्या २०-२२ दिवसांत निर्णयांचा धडाका लावला आहे. आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देतानाच आता काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिक मनपा आयुक्त रमेश पवारांची उचलबांगडी यांच्या जागी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पालघरच्या जिल्हाधिकारीपदी जी. एम. बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मेट्रो कारशेड आरे कॉलनीतच उभारण्याचा निर्णय घेऊन आधीच्या ठाकरे सरकारला पहिला धक्का दिला. नंतर शिंदे एकापाठोपाठ एक धक्के देतच गेले. आता काही अधिकाऱ्यांच्या बदल्या या सरकारने केल्या आहेत.

हेही वाचा – सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, शस्त्राच्या परवान्यासाठी केला अर्ज?

नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार हे ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. त्यांची अवघ्या एक महिना सात दिवसात बदली करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून २४ मार्च २०२२ रोजी रमेश पवार यांनी पदभार स्वीकारला होता. डॉ पुलकुंडवार हे आयएएस अधिकारी आहेत. ते याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आता या नव्या नियुक्तीमुळे नाशिक पालिकेला मिळणार आयएएस अधिकारी आयुक्त म्हणून लाभणार आहे. शिवाय, नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

याशिवाय, जी. एम. बोडके यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उल्हासनगरचे माजी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची सांगली जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर आतापर्यंत डॉ. अभिजित चौधरी होते. आता डॉ. चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेचे आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – शिर्डीच्या साईबाबांचरणी ४० लाखांचा सुवर्ण मुकूट दान