मनसेचा दणका : नाशिकरोड विभागीय मनपा अधिकार्‍यांची बदली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिकरोड विभागीय अधिकार्‍यांची बदली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतीच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे करण्यात आली होती. मनसेच्या मागणीची दखल घेत आयुक्त गमे यांनी नाशिकरोड विभागीय अधिकार्‍यांची बदली केली आहे. नूतन विभागीय अधिकारी दिलीप मेणकर यांचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी अभिनंदन केले.

नाशिक महानगरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकरोड कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने नाशिक रोडमधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी नुकतेच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आले होते. यावेळी मनसेच्या वतीने आयुक्त गमे यांच्याकडे विभागीय अधिकार्‍यांच्या बदलीची मागणी निवेदनाव्दारे केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकार्यक्षम अधिकारी बदलून त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमावा, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसेचे विभाग अध्यक्ष विक्रम कदम, जिल्हा चिटणीस संतोष पिल्ले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष शहाणे, किशोर जाचक, शाम गोहाड, प्रमोद साबळे, नितीन पंडित आदींनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या.

मनसेच्या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त गमे यांनी महापालिकेच्या विभागीय अधिकार्‍यांची बदली केली असून विभागीय अधिकारीपदी दिलीप मेणकर यांची वर्णी लागली आहे. आयुक्तांनी दखल घेत अधिकार्‍यांची बदली केल्याने मनसेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.