कोरोनाच्या उद्रेकात पोलिसांच्या बदल्या हा तर अमानवीपणा

police coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे त्या विरोधात रस्त्यावर उतरून २४ तास लढणाऱ्या पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य पोलीस दलात मोठा असंतोष खदखदत आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाशी लढताना मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत. काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनाही कोरोनाची यामुळे लागण झाली आहे. मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यातच राज्याचे गृहखाते मशगुल असल्याने पोलीस दलात अस्वस्थतेचे आणि नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच आता पोलिसांच्या बदल्यांमध्ये लक्ष घालून दिवाळीपर्यंत बदल्या पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी पोलीस दलातून पुढे येऊ लागली आहे.

राज्यभरात तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक या जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तर आजमितीला शंभराहून अधिक पोलिस कर्मचारी आणि काही अधिकारीही कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर कोरोनाच्या बंदोबस्ताचा प्रचंड ताण आहे. राज्यभरात लॉकडाऊन सुरू होऊन साडेचार महिने उलटले आहेत. राज्यातील जनतेचे कोरोना पासून संरक्षण व्हावे, याकरिता वरिष्ठ आयपीएस अधिकारी यापासून ते पोलीस शिपायापर्यंत प्रत्येक पोलीस कोरोना विरोधातील लढाईत ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता आणि प्रसंगी प्राणाचे बलिदान देऊनही राज्यातील जनतेचे संरक्षण करत आहे.

कोरोनाच्या उद्रेकात शहरी भागातील विशेषत: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमधील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अक्षरशः होरपळून निघाले आहेत. राज्यातील ठाकरे सरकारने विशेषतः गृहखात्याने या कोविड योद्धयांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्या मागे बदल्यांचा ससेमिरा लागल्याने या पट्ट्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गृहखात्याच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता गृह खात्यातील बेलगाम कारभाराला आवर घालावा आणि शहरी भागातील कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन येत्या दिवाळीपर्यंत तरी या शहरी परिसरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी पोलिस दलातून केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची नाराजी?

राज्यात कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाम विरोध होता. मात्र गेल्या साडे चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेले लॉकडाऊनमुळे राज्याचा आर्थिक गाडा पूर्णपणे ठप्प झाला आहे. याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरी बरोबरच मंत्री, आमदार, खासदार यांनाही बसत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्याशिवाय लक्ष्मीदर्शन होत नसल्यामुळे राजकीय नेते हवालदिल झाले आहेत. मात्र कोरोनाच्या उद्रेकात मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे बळी जात असताना, त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर हल्ले होत असताना बदल्यांचा ससेमिरा मागे लावणे हे अमानवी आणि असंवेदनशील कारभाराचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ आयपीएस अधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.

शहरी भागात ७४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबईतील ४२ पोलीस, ३ अधिकारी अशा एकूण ४५, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १,जालना SRPF १ अधिकारी व १ पोलीस , अमरावती शहर १ wpc,उस्मानाबाद १, नवी मुंबई SRPF १ अधिकारी अशा ७४ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. सध्या १२६ पोलीस अधिकारी व १०२० पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर बरेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोनावर मात केल्याने बचावले आहेत.