कोकणवासीयांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी, ७ तासांत प्रवास शक्य

Vande Bharat Express

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी प्रवासी यंत्रणा मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत हा संपूर्ण स्वदेशी बनावटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण भारतात वंदे भारत एक्स्प्रेसचा डंका वाजत असून १० अत्याधुनिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस – सोलापूर आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस – शिर्डी यानंतर आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव (गोवा) अशी रेल्वेसेवा कोकणवासियांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली प्राथमिक चाचणी काल (मंगळवार) यशस्वीपणे पार पडली. या एक्स्प्रेसने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव (गोवा) हे अंतर केवळ ६ तास ५७ मिनिटांत पार केले तर, मुंबई ते रत्नागिरी हे अंतर कापण्यासाठी या एक्स्प्रेसने अवघा ४ तास २७ मिनिटांचा कालावधी घेतलाय.

मुंबईवरून सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी सुटलेल्या या हाय स्पीड एक्स्प्रेसने एकूण ५८१ किलोमीटरचे अंतर सुमारे ७ तासांत पूर्ण केले आहे. ही चाचणी अनुभवण्यासाठी विविध ठिकाणातील रुळांजवळ अनेक स्थानिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात या चाचणीचे क्षण टिपले. मात्र, ही पहिली चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर आणखीन दोन ते तीन चाचण्या घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चाचण्यांच्या यशानंतर मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकूलित आणि अतिजलद अशा वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवाशांना अनुभव घेता येणार आहे. या गाडीमुळे कोकणातील पर्यटनालाही मोठा फायदा होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वन्दे मातरम् आणि इंटरसिटी एक्सप्रेस सेवा (नवीन गाडी) सुरू करावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात निवेदन दिले आहे. भारतीय रेल्वेतील महाराष्ट्रात मध्य रेल्वेतील विभागलेल्या; कोकण रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची आणि अधिकाधिक रेल्वे अर्थव्यवस्थेसह प्रवाशांच्या हिताची आणि खूपच लाभदायक सेवा आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, रोहा ते थेट मडगाव (गोवा) मेंगलोर (कर्नाटक) अशी कमी अंतराची कोकणपट्ट्यातील कोकण विभागातील कोकणवासीयांसाठी सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी सेवा मानली गेली आहे.

सध्या औद्योगिक आणि व्यवसायिक तसेच ग्रामीण भागातील सेवा विद्युतीकरणाबरोबर कोकण रेल्वे मार्गावरही विद्युतीकरण रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबई,दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, पनवेल स्थानकातून दैनंदिन रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव आणि मेंगलोर पर्यंत कोकण रेल्वे सेवा देत प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही बाबतीत उपयुक्त ठरली आहे. विद्युतीकरणाने कोकण रेल्वे सेवा जलद आणि सुरक्षित झाल्यामुळे सध्याच्या सेवेत कोकण रेल्वे मार्गावर वंदे मातरम् एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांची नवीन सेवा मिळावी, अशी मागणी संघाचे प्रमुख राजू कांबळे आणि अध्यक्ष सुजित लोंढे यांनी केली आहे.

वंदे भारत एक्सप्रेस कशी बनली

एका महिला लोको पायलटनं ही ट्रेन चालवल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन पहिल्यांदाच चर्चेत आली. या पायलटचे नाव सुरेखा यादव आहे. पण सुरेखा व्यतिरिक्त आणखी एक नाव आहे, ज्यांचे सर्वात मोठे योगदान वंदे भारत एक्सप्रेसला देशाचा अभिमान बनवण्यात आहे. या ट्रेनचे निर्माते सुधांशू मणी आहेत.

ICF महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, वंदे भारत ट्रेन ही आंतरराष्ट्रीय दर्जाला स्पर्श करते. आम्ही अशी ट्रेन बनवण्याबाबत खूप दिवसांपासून नियोजन करीत होतो. २०१६ च्या अखेरीस ICF ने अशी एक ट्रेन बनवण्याची कल्पना मांडली. एप्रिल २०१७ मध्ये आम्हाला अशा २ गाड्या बनवण्याची परवानगी मिळाली आणि आम्ही हे करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे, असं सुधांशू मणी म्हणाले.


हेही वाचा : कोकणातही वन्दे मातरम् सेवा सुरू करावी