घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकझाकीस्तानमध्ये दिमाखात फडकला तिरंगा; अश्विनी देवरे पहिल्या पोलीस ‘आर्यनमॅन’

कझाकीस्तानमध्ये दिमाखात फडकला तिरंगा; अश्विनी देवरे पहिल्या पोलीस ‘आर्यनमॅन’

Subscribe

एकाच वेळी १९ विजेते; प्रशांत डाबरी, महेंद्र छोरिया, अरुण गचाळे यांची हॅट्ट्रिक

नाशिक : येथील शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी कझाकीस्तानमध्ये मोठ्या दिमाखात तिरंगा फडकवला. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस आर्यनमॅन होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरू असताना महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस नाईक अश्विनी गोकुळ देवरे यांनी मात्र कझाकिस्तानमध्ये आपल्या कर्तृत्वाने दिमाखात तिरंगा फडकवला. अत्यंत खडतर समजल्या जाणार्‍या आर्यनमॅन स्पर्धेचे प्रत्येक घटक वेळेत पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची आणि भारताची ख्याती सातासमुद्रापार झळकावली. मुख्य म्हणजे, या सत्रात एकाच वेळी तब्बल १९ आयर्नमॅन यशस्वी झाल्याने आता नाशिककडे आयर्नमॅनची खाण म्हणून पाहिले जात आहे.

कझाकिस्तानमध्ये झालेल्या या आर्यनमॅन स्पर्धेत जगभरातील स्पर्धकांबरोबर देवरेदेखील सहभागी झाल्या होत्या. 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. यात तीनही टप्पे अश्विनी देवरे यांनी १७ पैकी 14 तास 24 मिनिटे 46 सेकंदातच पूर्ण करून सर्वांचेच लक्ष वेधले. यात दोन तास एक मिनिट 42 सेकंदात स्विमिंग, सात तास नऊ मिनिटे 30 सेकंदात सायकलिंग व चार तास 53 मिनिटे 32 सेकंदात रनिंग पूर्ण करत आयर्नमॅन होण्याचा मन मिळवला. स्पर्धा जिंकल्यानंतर अश्विनी देवरे यांना विशेष पदकाने गौरविण्यात आले.

- Advertisement -

देवरे या पोलीस दलात 2019 भरती झाल्या असून सध्या जिल्हा बदली झाल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस खात्यातील कर्तव्य बजावतानाच त्या संसारांचा गाडाही मोठ्या हिमतीने हाकत आहेत, मात्र वैशिष्ठ्य म्हणजे हे सर्व करताना त्या अनेक स्पर्धांमध्ये विजयीदेखील होत आहेत. श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 40 सुवर्ण, 21 रौप्य, 28 कांस्य पदके पटकावली आहेत. आता या जागतिक स्तरावरील आयर्नमॅन स्पर्धेतही त्यांनी बाजी मारून महाराष्ट्र पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली.

दरम्यान, या यशानंतर अश्विनी देवरे म्हणाल्या की, नोकरी करण्याच्या आधीपासून खेळाची विशेषत: धावण्याची आवड असल्याने ही स्पर्धा फार कठीण वाटली नाही. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर पॉवर लिफ्टिंग व वेट लिफ्टिंगमध्ये करिअरला सुरुवात केली. यश तर मिळाले, पण मणक्याचा त्रास सुरू झाला. यामुळे या खेळांमध्ये पुढे करिअर झाले नाही. शिवाय दरम्यानच्या काळात लग्नही होऊन नाशिकमध्ये बदली झाली. दोन मुलांना घेऊन आपला संसाराचा गाडा हाकताना पोलीस दप्तरी कर्तव्य आणि खेळाला समांतर वेळ दिला. आजही परिस्थिती काहीही असो, माझा सराव बंद पडत नाही. रोज सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सराव सुरू असतो, ज्याचे फळ मला या आयर्नमॅन स्पर्धेतही मिळाले आहे, असे त्या गौरवाने म्हणाल्या.

- Advertisement -

एकाच वेळी १९ विजेते

 जागतिक स्तरावर एकाचवेळी एकाच शहरातील तब्बल 19 आयर्नमॅन यशस्वी झाले, ही बाब म्हणजे जागतिक स्तरावर नवा विक्रम ठरली. ऐन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाव्या वर्षी ही गौरवार्ह गोष्ट नोंदवली गेल्याने भारतीयांचा सातासमुद्रापार डंका वाजला. विशेष म्हणजे प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि डॉ. अरुण गचाळे यांनी सलग तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत हॅट्ट्रिक केल्याने त्यांच्या कामगिरीचीही सर्वत्र चर्चा झाली.

कझाकिस्तानमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत यंदा 22 नाशिककर सहभागी झाले होते. भारतीय हवामान व कझाकिस्तानमधील वातावरण यात प्रचंड मोठा फरक असल्याचे सुरुवातीपासून स्पर्धा वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रत्येकासमोरच निर्माण झाले होते. त्यात भाषा व आहारामुळेदेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, निर्धारित वेळेतच ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानुसार स्पर्धेची सुरुवात स्विमिंगने झाली. खुल्या जलप्रवाहात 2 हजाराहून अधिक स्पर्धक एकाचवेळी सहभागी झाले. खुला जलप्रवाह असल्याने दिशेबाबतची अनिश्चिता, वेगाने येणार्‍या लाटा अन् स्पर्धकांची गर्दी यामुळे हा प्रकार पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले. प्रचंड वेगाने वाहणार्‍या वार्‍यांचा सामना करत 180 किमी सायकलिंग स्पर्धा व त्यानंतर 42 किमी धावणे असे विविध टास्क पूर्ण करत नाशिककर स्पर्धकांनी निर्धारित साडेसोळा तासांत ही स्पर्धा पूर्ण करत आर्यनमॅनचा किताब पटकाविला. या अनोख्या विक्रमामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

हे बनले आयर्नमॅन :

डॉ. वैभव पाटील, डॉ. पकंज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडीया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झवर, नीता नारंग, अविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरीया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार या १९ जणांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -