केवळ आडनाव ‘ठाकरे’ असून चालत नाही – अमृता फडणवीस

'केवळ ठाकरे आडनाव असून चालत नाही', अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

‘केवळ ठाकरे आडनाव असून चालत नाही’, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’, असे विधान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखे काम करावे लागते. त्यानुसार काम केले तरच माणसे मोठी होतात’,अशी बोचरी टीका ट्विटरद्वारे केली आहे.

अमृता फडणवीस यांची बोचरी टीका

माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही या राहुल गांधी यांच्या विधानावरुन हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले आणि या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात देखील याच मुद्द्यावरुन झाली. राहुल गांधींच्या विधानावरुन गेले १५ दिवस वादावादीमध्ये गेले आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धागा पकडून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी साधली.

देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, ‘खरं आहे देवेंद्र फडणवीसजी…त्याचप्रमाणे केवळ ‘ठाकरे’ आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही…त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावे लागते… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते…’,असं ट्विट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग देखील केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.


हेही वाचा – ‘ठाकरे’ सरकार विश्वासघाती सरकार