घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण? चर्चा जोरात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण? चर्चा जोरात

Subscribe

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे उमेदवार कोण? यावर आता जवळपास पडदा पडला आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच माढात पवार साहेबांनी लढावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे पवार हेच येथे निवडणूक लढवणार याचा अंदाज बांधला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण? याची जोरदार चर्चा पक्षात रंगू लागली आहे. पक्षाकडून अजूनतरी अधिकृतरित्या घोषणा झाली नसली तरी सोशल मीडियावर रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, महेबुब शेख आणि विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसते. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे बैठक होत आहे. या बैठकीत माढा आणि युवक प्रदेशाध्यक्षपदाबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे.

हे वाचा – लोकसभेत जाण्यामागे शरद पवारांचा हा असू शकतो हेतू?

- Advertisement -

आधीचे युवक अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर युवक अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. याआधी युवक अध्यक्ष म्हणून उदय सामंत, उमेश पाटील, निरंजन डावखरे आणि संग्राम कोते पाटील यांनी काम पाहिलेले आहे. यावेळी नेत्याच्या नातेवाईकाऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी, अशी चर्चा कार्यकर्त्यांनी सुरु केली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते मात्र यावर व्यक्त झालेले नाहीत.

संभावित उमेदवारांची थोडक्यात माहिती

आता चर्चेत असलेल्या नावांपैकी रविकांत वर्पे हे राष्ट्रवादीचे माजी माध्यम प्रमुख होते. तर युवक संघटनेत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. सुप्रिया सुळे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून रविकांत वर्पे ओळखले जातात.

- Advertisement -

सुरज चव्हाण हे सध्या माध्यम प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. युवक संघटनेच्या सरचिटणीसपदी देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. शिवाय हल्लाबोल यात्रा, संघर्ष यात्रा आणि निर्धार परिवर्तनाचा या उपक्रमाच्या नियोजनात मुख्य जबाबदारी पार पाडलेली आहे.

हे देखील वाचा – अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली

तर महेबुब शेख हे विद्यार्थी आणि युवक संघटनेत कार्यरत होते. बीड जिल्ह्यातून येणाऱ्या शेख यांना शेती, दुष्काळ आणि बेरोजगारीच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आणि ग्रामीण शैलीत भाषण करण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे.

विक्रांत जाधव हे माजी मंत्री भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत. मागे विद्यार्थी प्रेदशाध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र अंजिक्यराणा पाटील यांना ते पद मिळाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून विक्रांत जाधव यांची कामगिरी चांगली सुरु आहे.

मात्र ही नावे चर्चेत असली तरी पक्षाकडून कुणाची वर्णी लागणार हे मात्र आता सांगणे कठिण आहे. यासाठी चर्चेतल्या उमेदवारांसहीत कार्यकर्त्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -