देवेंद्र फडणवीसांना अटक करा, चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटर वॉर

व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही' मंडळी भ्याड - चित्रा वाघ

Twitter war between Chitra Wagh and Rupali Chakankar on demand of Arrest Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांना अटक करा, चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटर वॉर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. कोरोनाबाधितांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन राज्यात रविवारी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पार्ल्यातील पोलीस स्थानकात जाऊन फार्मा कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्यामुळे दबाव टाकल्याचा आरोप करत अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या मागणीला प्रत्युत्तर दिले होते. यावर रुपाली चाकणकर यांनी पुन्हा पलटवार केले असल्याने चांगलेच ट्विटर वॉर रंगले आहे.

काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर

पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करुन एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितका दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना एकच शिक्षा असते, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

फडणवीस यांना अटक करण्याच्या मागणीवर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? रेमडेसिवीर राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणं झाले होते. ही माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणत सहकार्य करा आणि आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली चाकणकर यांचा पुन्हा पलटवार

बरोबर आहे, अटक होणं सोपं नसतं. अटक होणे म्हणजे काय हे समजण्यासाठी “लाचखोर” असावं लागतं. पैसे खाल्ल्यानंतर अटक टाळण्यासाठी पक्ष बदलावा लागतो. ज्यांनी आपल्याला समाजात मानाचं स्थान दिलं त्यांच्यावर भर सभेत टीका करावी लागते. यासाठी दगडाचं काळीज असावं लागतं. खरंच, अटक होणं सोपं नसतं अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही’ मंडळी भ्याड – चित्रा वाघ

आजुबाजुला काय चाललयं याचं भान नक्कीच मला आहे पण ज्या पद्धतीत आमच्यावर चिखलफेक चालू आहे त्याला उत्तर देणंही गरजेचं एकीकडे सरकारने सहकार्याची अपेक्षा ठेवायची आणि हे वाचाळवीर असे सुटलेत प्रश्न उपस्थित केला कि उत्तर हे द्यावचं लागणार म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतोय आधी कुठलीही माहिती न घेता तोंड उचकटायचं मग अंगाशी आलं कि माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही’ मंडळी भ्याड आहेत, मी खंबीर आहे माझी लढाई लढायला, राहीलं माझं नात माझ्या बापाशी ते तुमच्यासारख्यांना काय कळणार
असेल हिंमत तर विचारून बघा त्यांना तेचं चांगल उत्तर देतील असे ट्विट करत रुपाली चाकणकर यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.