घरCORONA UPDATEमहावितरणच्या ग्राहकांना अडीच महिन्याचे एकत्रित बिल

महावितरणच्या ग्राहकांना अडीच महिन्याचे एकत्रित बिल

Subscribe

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. 

राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना वीज बिलाचा मोठा झटका ऐन लॉकडाऊनच्या स्थितीत बसण्याची शक्यता आहे. राज्यातील महावितरणच्या अनेक परिमंडळात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे.

वीजबिलाचे प्रत्येक महिन्यानुसार विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला आहे. ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे महावितरणने केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीजबिल वाटप बंद केले. एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग घेणे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्याचे बिल आकारण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा अधिक वापर होता. मात्र कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारण्यात आले.

- Advertisement -

आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे दोन-अडीच महिन्याचे एकत्रित बिल देण्यात येत असताना हे बिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकत्रित दिलेल्या बिलात विभाजन करून ग्राहकांना स्लॅब बेनेफिटही देण्यात आला आहे. मीटर रीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येतील. तसेच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेची वीजबिलातून कपात करण्यात आली आहे. यासंदर्भातील सर्व माहितीही वीजबिलात देण्यात आली आहे.

कार्यालयातील गर्दी टाळा

वीजबिलाची दुय्यम प्रत मिळवणे व बिलाच्या दुरुस्तीसाठी वीज ग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयात सध्या गर्दी करत आहेत. नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ‘एसएमएस’ दाखवूनही बिल भरणा केंद्रात वीजबिल भरता येते. त्यासाठी आपला मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवावा. वीजबिल भरणा व अधिक बिलाच्या तक्रारीसाठी महावितरणचे www.mahadiscom.com हे संकेतस्थळ किंवा ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप यांचा वापर करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनी कार्यालयात गर्दी करणे टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -