बारामतीत भर कार्यक्रमात सुप्रिया सुळेंसमोरच दोन गट भिडले

supriya sule

बारामती – बारामती तालुक्यातील जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो. गावठाणात रस्ता रुंदीकरण १० मीटर व्हावा की सात मीटर व्हावा यावरून गावकऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातूनच खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच दोन गटांत वाद सुरू झाला. या वादात खुद्द सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालत दोन्ही गटाची समजूत काढली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर येणार असल्याने बारामतीच्या राजकारणावर सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच एका कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. रस्त्याच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं. यामुळे या दोन्ही गटांतील वाद मिटला.

काय आहे वाद?

डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. दहा मीटर रुंदीकरणाचा या ठिकाणी प्रस्ताव असून येथे सात मीटरचा रस्ता बांधावा अशी मागणी काही ग्रामस्थांकडून करण्यात येतेय. त्यामुळे या रस्त्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. सुप्रिया सुळे आज या गावात दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यापर्यंत गेलं. याप्रकरणी चर्चा सुरू असतानाच दोन्ही गटांत वाद निर्माण होऊन गोंधळ झाला. अखेर सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांचे म्हणणे एकून घेत ग्रामस्थांची समजूत घातली. विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन सुळेंनी दिले.