बदलापूरात आगीच्या दोन घटना, सुदैवाने जीवितहानी नाही

बदलापूर : बेलवली परिसरात काल, सोमवारी घराच्या गॅलरीला भीषण आग लागली होती. सोसायटीमध्ये होळी पेटवल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बेलवली परिसरातील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. तर, बदलापूरच्या एरंजाड परिसरात गवताला आग लागल्याने एका जुन्या घराला भीषण आग लागली होती. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले.

राज्यभरात सोमवारी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. कोरोनाचे संकट टळल्याने यंदा होळी जास्त उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. प्रत्येक गृहसंकूलात सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवून होलिका दहन करण्यात आले. बदलापूर शहरात सुद्धा अनेक गृहसंकूलात होळी साजरी करण्यात आली. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी पेटवलेल्या होळीची आग उंच गेल्याने इमारतीतील तिसऱ्या मजल्याने पेट घेतला.

होळीत असलेल्या पेंढ्याच्या ठिणग्या तिसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीत जाऊन पडल्या. त्यानंतर गॅलरीत ठेवलेली रद्दी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही अग्निरोधक यंत्रणा नसल्याने रहिवाशांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करत ही आग विझविण्यात आली. या घटनेमुळे बदलापूर शहरातील इमारतीत असलेल्या अग्नीरोधक यंत्रणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आगीच्या भक्षस्थानी जुन्या आठवणी
एरंजाड परिसरात भोईर कुटुंबीयांचे 50 वर्षांपूर्वीचे वडिलोपार्जित घर आहे. सोमवारी संध्याकाळी अज्ञातांनी या घराशेजारील गवताला आग लावली. ही आग पसरल्याने भोईर कुटुंबीयांच्या घरालाही आग लागली. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा देखील सुटला होता, त्यामुळे ही आग वेगाने पसरत गेली. या आगीत भोईर कुटुंबीयांचे संपूर्ण घर भस्मसात झाले. या घरात भोईर कुटुंबीयांनी जतन करून ठेवलेल्या अनेक वस्तू होत्या. या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांचे हे घर होते. सुदैवाने या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांना विचारले असता जुन्या पद्धतीचे लाकडी धाब्याचे घर असल्याने आगीत घर जळून खाक झाले आहे.

आमचे आजोबा, वडील त्यांच्या काळातील अनेक वस्तू या घरात जतन करून ठेवल्या होत्या. यामध्ये कपाट, दिवाण, लाकडी रॅक आणि इतर फर्निचर होते. घर सुद्धा संपूर्ण जुन्या पद्धतीचे होते. त्यांचा तो वारसा जतन रहावा, यासाठी आम्ही घराची पुनर्बांधणी सुद्धा केली नव्हती. मात्र अचानक आग लागल्याने आमच्या वडिलोपार्जित आठवणींची राख झाली आहे, असे माजी नगरसेवक किरण भोईर म्हणाले.