ठाण्यात छताचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; गंभीर जखमी आईला हलविले मुंबईला

संग्रहित

ठाणे : घरातील छताचे प्लास्टर पडून माय-लेक जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास बाळकुम पाडा नंबर-1 येथे घडली. गंभीर जखमी झालेल्या मातेला पहाटे तातडीने मुंबईला हलविण्यात आले.

आशा मनोहर पाटील (44) आणि आयुष (20) अशी जखमींची नावे आहेत. बाळकुम पाडा नंबर-1 येथील सखुबाई टॉवर जवळ पाटील आळीमधील मनोहर रामकृष्ण पाटील यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली घर आहे. हे घर जवळपास 12 वर्षं जुने असून त्या घरात आशा आणि आयुष यांच्यासह अन्य दोघे होते. पहाटे 3 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास घरातील छताचे प्लास्टर आशा आणि आयुष हे झोपी गेलेल्या ठिकाणीच पडले.

घटनेची माहिती कळताच घरातील मंडळींनी तसेच परिसरातील नागरिकांनी दोघांना त्वरित ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा पाटील यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईत उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तर आयुष याला किरकोळ दुखापत झाली आहे.
आशा या गंभीररित्या जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पहाटे त्यांना मुंबईत हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

दोनच दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये दुर्घटना
घाटकोपरच्या पंतनगर परिसरात दोनच दिवसांपूर्वी एका इमारतीची संरक्षक भिंत निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात कोसळली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संरक्षक भिंत कोसळ्याने या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता.

इमारतीच्या पायाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी रहिवाशांना इमारतीबाहेर काढले होते. या घटनेला जबाबदार बिल्डरवर कारवाई करण्याचा मागणी इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे.

मुंबईत 337 धोकादायक इमारती
मुंबई शहर व उपनगरे भागातील तब्बल 337 जुन्या इमारती या अतिधोकादायक स्थितीत आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारत अथवा इमारतींचे लहान- मोठे भाग कोसळण्याच्या किमान 150 दुर्घटना घडत असतात. त्यामध्ये जीवित व वित्तीय हानी होत असते. या 337 अतिधोकादायक इमारतींपैकी शहर भागात 70, उपनगरे भागात 267 अतिधोकादायक इमारती आहेत.