Homeमहाराष्ट्रKurla Bus Accident : दोन वकिलांची मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव; अपघाताला नवं...

Kurla Bus Accident : दोन वकिलांची मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव; अपघाताला नवं वळण?

Subscribe

बेस्टच्या भाडे तत्वावरील बस गाडीवरील कंत्राटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने कुर्ला येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी मानवाधिकार आयोगाची एन्ट्री झालेली आहे.

मुंबई : बेस्टच्या भाडे तत्वावरील बस गाडीवरील कंत्राटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने कुर्ला येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 40 वाहनांचे नुकसान झाले. तर 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. रात्री साडे नऊच्या सुमारास अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता या अपघात प्रकरणी मानवाधिकार आयोगाची एन्ट्री झालेली आहे. (Two lawyers approach Human Rights Commission panel in Kurla BEST bus accident case)

सोमवारी रात्री पावणेदहा वाजता 332 क्रमांकाच्या कुर्ला-अंधेरीदरम्यान धावणार्‍या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरुन जाणार्‍या तसेच पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. यावेळी बसने अनेकांना चिरडले. या अपघातात सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. जखमींपैकी 18 जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले तर इतर 22 जखमींवर अद्याप भाभा, सायन, हबीब, कुर्ला नर्सिंग होम, कोहीनूर क्रिटीकेअर आणि सेव्हन हिलमध्ये उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. संबंधित चारही पोलीस कर्मचारी तिथे बंदोबस्तावर हजर होते. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – Kurla Bus Accident : अवघ्या 2 सेकंदांने जीव वाचलेल्या अमनने सांगितला अपघाताचा थरार; म्हटले…

अपघातानंतर चालक संजय मोरे हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातप्रकरणी संजय मोरे याच्याविरुद्ध 105, 110, 118, 118(2) भारतीय न्याय संहितेसह वाहतूक कायदा कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवून नंतर त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी कुर्ला येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. कारण संजय मोरे याला इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) चालविण्याचा अनुभव नव्हता. त्याने फक्त दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणात आशिष राय आणि पंकज मिश्रा या दोन वकिलांनी मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

दोन्ही वकिलांचे म्हणणे काय?

दरम्यान, वकिलांनी आरोप केला आहे की, बेस्ट प्रशासनाकडून चालकांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. चालक अतिशय भीषण परिस्थितीत काम करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे चालकांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. त्यांच्या कामाचे तास निश्चित असणे गरजेचे आहे, मात्र याबद्दल बेस्ट प्रशासनाला कोणतंही गांभीर्य नाही. सध्याच्या घडीला बेस्टच्या सेवेत असलेल्या सगळ्या बस चालकांचे वेळापत्रक तपासण्यात यावे. त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक तास राबवून घेतलं जात आहे का? या चौकशी करावी. बेस्ट प्रशासनाकडून चालकांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. याच गोष्टी अपघातांना जबाबदार आहेत. असा दावा कुर्ला अपघात प्रकरणी निष्पक्ष चौकशीचे आदेश आयोगानं द्यावेत आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Kurla Accident : कुर्ला बस अपघातातील ह्रदयद्रावक घटना; दुकानदार मदतीला धावला, हाती मुलाचा मृतदेह लागला


Edited By Rohit Patil