‘पीएफआय’च्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून मालेगावात अटक

नाशिक : वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) दोन कार्यकर्त्यांना मंगळवारी (दि.२७) पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली. इमाम कौन्सिलचा राज्य अध्यक्ष संशयित इरफान दौलत नदवी (वय ४० रा. गुलशेरनगर) आणि ‘पीएफआय’चा रशीद शहदैन शहीद इक्बाल (वय २७ रा. इस्लामपुरा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

‘पीएफआय’ या वादग्रस्त संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर सहा दिवसांपूर्वी देशभरात छापेमारी झाली. याप्रकरणी नाशिकमध्ये एटीएसने तळ ठोकत तपास सुरू केला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर राज्यभरात पडसाद उमटत असून, काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सर्व विभागांना ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानुसार संशयित नदवी आणि इक्बाल यांच्या हालचाली संशयास्पद आल्या. ते दोघे प्रक्षोभक भाषणे, आंदोलन, मोर्चात अग्रेसर राहत असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतर्फे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची पुढील चौकशी सुरू असून, आखणी काहींना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

दशहतवाद्यांना पैसे पुरविण्यासह समाजात अशांतता पसरेल, असा कट रचल्याच्या संशयात पीएफआयच्या पाचजण सहा दिवसांपासून दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात आहेत. याप्रकरणी राज्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांची आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगावातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी
केली जात आहे.

एटीएसच्या पथकाने सहा दिवसांपूर्वी पीएफआयचा मालेगाव जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (वय २७, रा. हुडको कॉलनी), यासह पुण्यातील उपाध्यक्ष अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा., कोंडवा), वरिष्ठ नेता रझी अहमद खान (३७, रा. कोंडवा खुर्द), सदस्य वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अझीझपुरा, बीड) आणि विभागीय सचिव मौला नबीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) हे एटीएस कोठडीत आहेत. नाशिक एटीएससह वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक नाशिकमध्ये दिवसरात्र त्यांची कसून चौकशी करत आहेत.

रशीद शहदैन शहीद इक्बाल व इरफान दौलत नदवी यांच्याविरुद्ध १५१ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे मालेगाव पुन्हा रडारवर आले आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांची राज्यभर आंदोलने सुरु असल्याने मालेगावमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.