धक्कादायक! नगरमध्ये आढळले आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

नगरमध्ये आणखी दोनजणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

corona patients

कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत नाही, तोच आणखी दोन नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नगरमध्ये भर पडली आहे. नगरमध्ये कोरोनाबाधित सापडलेले दोन्ही रुग्ण हे परदेशी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित आणखीन नऊ लोकांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. नगरमध्ये यापूर्वी तीन कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी एका रुग्णाच्या १४ दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. त्यामुळे नगरमधील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती, ही दिलासादायक बाब समोर येत नाही तोच आणखी दोघा परदेशी व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नगरची संख्या तीनवरून चारवर गेली आहे.

संपर्कात आलेल्या ९ जणांचीही तपासणी

रविवारी आढळलेल्या रुग्णांपैकी एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. या दोघांशी संबंधित असलेल्या नऊ लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चाचण्या देखील तपासणीसाठी तातडीने पुण्याला पाठवण्यात आले आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आता प्रशासनाने शोध सुरू केला आहे. नगरमध्ये आलेल्या परदेशी व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासन देखील या प्रकारामुळे हादरले आहे.

प्रशासनाचं गर्दी टाळण्याचं आवाहन

नगरमध्ये सलग दोन जण बाधित सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.


Corona: वाशी APMC मार्केटची गर्दी टळेना; अखेर निर्णय झालाच!