घरताज्या घडामोडीनाशकात आणखी दोघांचा मृत्यू

नाशकात आणखी दोघांचा मृत्यू

Subscribe

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंदोबस्तावर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या जीवाला निश्चितच धोका वाढला आहे. आता मोठ्या संख्येने पोलिसांना बाधा होऊ लागली असताना करोनामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे. सोमवारी सकाळी मविप्र रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५३ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. संबंधित कर्मचारी ग्रामीण गुन्हे शाखेचे असून, ते मालेगावी बंदोबस्तावर होते. अद्याप त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पेठरोड परिसरातील एका 36 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने आता शहरातील मृतांचा आकडा पाचवर गेला आहे.

दरम्यान, पेठरोडवरील मृत रुग्णासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले की, या व्यक्तीस काही दिवस ताप, घशात दुखणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 21 मे रोजी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ते तपासणीसाठी गेले. त्यांना पूर्वीपासूनच मधुमेहाचा विकार होता व रक्तातील साखरेचे प्रमाण सहाशेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले, म्हणून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जिल्हा रुग्णालयात त्यांच्या छातीच्या एक्स-रे मध्ये न्युमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू होते. 22 मे रोजी सायंकाळी त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने पूर्णवेळ ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात येत नव्हते. 24 मे रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने पूर्ण प्रयत्न करूनही सोमवारी त्यांचे निधन झाले.

दरम्यान, दुसरे पोलीस कर्मचारी मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना त्रास जाणवू लागला. याची दखल घेत त्यांना दोन दिवसांपूर्वी आडगांव येथील डॉ. वंसतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होेते. सोमवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कर्मचार्‍याचा वैद्यकीय अहवाल अद्याप येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -