दोन ट्रेन अचानक आल्या समोरासमोर, प्रवाशांना काही कळायच्या आतच…

औरंगाबाद – प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या लासूर रेल्वे स्थानकावर दोन ट्रेन समोरा-समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला. दोन्ही रेल्वेंची गती धीमी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी रेल्वे विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री सव्वासातच्या सुमारास जालना नगरसूल डेमो पॅसेंजर दोन क्रमांकाच्या फलाटावर जाणार होती. मात्र, चुकून एक क्रमांक प्लाटफॉर्मवर आली. यावेळी या रुळावर रेल्वेच्या विद्युतीकरण कामाची स्पेशल दोन डब्यांची रेल्वेगाडी उभी होती. त्यामुळे या गाड्या समोरासमोर आल्या. सुदैवाने रेल्वे स्थानक जवळ असल्याने गाडीचा स्पीड कमी होता. त्यामुळे डेमोच्या पॅसेंजर चालकाने गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दोन्ही गाड्यांमध्ये केवळ दोन ते तीन फुटांचे अंतर उरले होते.

या अपघाताबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणीतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सिग्नल यंत्रणेतील अधिकारी या अपघाताची कसून चौकशी करत आहेत. या अपघातात दोषी असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.