जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी दोन विश्व मराठी संमेलने, एकाचे आज उद्घाटन

मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे रंगणाऱ्या या संमेलनात जगभरातील पाचशेहून अधिक तर विविध राज्यांतून बाराशेहून अधिक मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याचा मराठी भाषा विभागाचा अंदाज आहे.

मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे रंगणाऱ्या या संमेलनात जगभरातील पाचशेहून अधिक तर विविध राज्यांतून बाराशेहून अधिक मराठी भाषिक उपस्थित राहणार असल्याचा मराठी भाषा विभागाचा अंदाज आहे. या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या ‘विश्व मराठी संमलेना’तून जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणले जाणार आहे. (Two World Marathi Meetings At The Same Time For Marathi People)

जगातील मराठी भाषिकांना एकत्र करण्यासाठी गेली वीस-पंचवीस वर्षे खासगी संस्था साहित्य-सांस्कृतिक संमेलने घेत आहे. अशातच आता शासनानेही विविध देशांती मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वैश्विक मराठी संमेलने होणार आहेत.

पुण्यातही पिंपरी येथे ६ ते ८ जानेवारीदरम्यान १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड अशा विविध देशांमधील मान्यवर मराठीजनांचा सहभाग असणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांच्याबरोबर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सहभाग असणार आहे.

मराठी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्व मराठी संमेलनात’ अमेरिकेहून येणाऱ्या मराठी भाषिकांना लाखभर मानधन, अमेरिकेतर देशातून येणाऱ्यांना ७५,००० रुपये मानधन तर महाराष्ट्राबाहेरील राज्यांतून येणाऱ्यांना ५०,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. कार्यक्रम ऐकायला येणाऱ्यांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणारे हे पहिलेच संमेलन असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.


हेही वाचा – संपावरील वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा बडगा, राज्य सरकारची नोटीस