फडणवीस-पवार पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

Devendra Fadnavis and Ajit Pawar

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात भुकंप घडलेल्या पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. हा पहाटेचा शपथविधी सोहळा आजही चर्चिला जात आहे. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राजभवनात पार पडलेल्या भाजप-राष्ट्रवादी युतीच्या सरकारने देशभरात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अडिच दिवस चाललेल्या सरकारची चर्चा तेव्हा जशी होती, तशीच चर्चा आताही आहे.

राष्ट्रवादी सोबत स्थापन करुन अल्पावधितच सरकार कोसळल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका होत होती. पहाटेच्या शपथविधीची सल फडणवीसांना आजही कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं बोलून दाखवलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पुन्हा येणार…अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्री आपणच होणार, असा विश्वास आणि अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना होती. राज्यात भाजपला १५० जागा मिळतील असा दावा भाजपचेच नेते करत होते. भाजपने १५२ जागांवर निवडणूक लढवली. तर त्यांच्या युतीमधील भागिदार शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली आणि उर्वरित १२ जागा त्यांच्या मित्र पक्षांनी लढवल्या.

या निवडणुकीत शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळविता आला. तर १५० जागा मिळतील असा दावा करणाऱ्याला भाजपला १०५ जागा मिळाल्या. बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता होती. शिवसेना आणि भाजपच्या मिळून १६१ जागा होत होत्या. मात्र, दोन्ही पक्षांचं मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलं. शिवसेनेने ठरल्याप्रमाणे अडिच-अडिच वर्ष मुख्यमंत्री होईल, यावर अडून राहिली. भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत आम्हाला शब्द दिला होता, असा दावा शिवसेना करु लागली. दुसरीकडे मात्र भाजप आम्ही असा शब्द दिलाच नाही, असं म्हणत होते.

भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्या समिकरणाची निर्मिती झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरु झाली. हे सर्व सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटे शपथविधी उरकला. पण हे सरकार फार काळ तग धरु शकलं नाही. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या ८० तासात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

२८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.