मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण मोदींकडून ही भेट नाकारण्यात आली. ज्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी विशेष पत्रकार परिषद आज शुक्रवारी (ता. 13 डिसेंबर) आयोजित केली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान केले आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धावेळी एक फोन करून ते युद्ध थांबवणाऱ्यांनी मोदींनी जिथे खऱ्या घटना घडत आहे, त्याठिकाणी आपली धमक दाखवावी, असे आव्हान दिले आहे. (UBT On Bangladesh Hindu violence Uddhav Thackeray challenge to PM Narendra Modi )
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदू अत्याचाराबाबत पत्रकार परिषद घेत म्हटले की, संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि येत्या सोमवारपासून (ता. 16 डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. गेले काही दिवस संसदेमध्ये कामकाज कसे सुरळीत चालू आहे, हे संपूर्ण देश पाहात आहे. देशातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहेत, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर सत्ताधारी उत्तरे देत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच होत नाहीये. महत्त्वाच्या विषयाला बगल देवून नको त्या विषयांवर चर्चा भरकटवली जात आहे, असा आरोप ठाकरेंनी केला. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत आणि हल्ले होत आहेत असे यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
दोन तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या भारतात आला होता. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ज्या देशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्या देशातील क्रिकेट संघाबरोबर क्रिकेट खेळणे किती योग्य आहे? असा प्रश्न आदित्य यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र, यावर सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. ते मिळणारही नव्हते. आता सुद्धा गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुरू आहेत. बांगलादेशात इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले, मंदिराच्या प्रमुखांना अटक करण्यात आली, हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, तरी आपले विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणांमध्ये गप्प का आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
ठाकरेंची मोदींनी विनंती…
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत म्हटले की, जसे आपण एका फोनरून युक्रेनचे युद्ध थांबवले होते. तसेच आता बांगलादेशात ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार आणि हल्ले होत आहेत, त्याबाबत आपण भूमिका घेऊन पाऊले उचलली पाहिजेत. कारण फक्त इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगे असे करून उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही. पण जिथे अत्याचार होत आहेत, त्यांनी आपली धमक दाखवण्याची गरज आहे, असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला आहे. तर हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे सांगावे असे आवाहनही ठाकरेंकडून करण्यात आले आहे.