मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ची बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे. आज या बैठकीचा दुसरा असून या बैठकीसाठी 28 राजकीय पक्षांचे 63 प्रमुख नेते सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमके कोणते महत्त्वाचे घेतले जातील, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. परंतु या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी कडाडून टीका केली आहे. आम्हाला गुवाहाटीचा खर्च विचारणाऱ्यांनी या काही तासांच्या बैठकीसाठी किती कोटी रुपयांचा खर्च झाला, याबाबतचा खुलासा करावा, असे आव्हान काल (ता. 31 ऑगस्ट) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आले. त्यानंतर आज (ता. 01 सप्टेंबर) पुन्हा सामंत यांनी इंडियाच्या बैठकीवर निशाणा साधला आहे. तसेच विरोधकांनी नीती आयोगाकडून मुंबईचा विकास करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून टीका केल्यानंतर सामंत यांनी विरोधकांवर आरोप केले आहे. (Uday Samant accusations against the opposition on the issue of Mumbai)
हेही वाचा – एकनाथभाऊंना विचारा जरा…, हा भ्रष्टाचारांचा मेळा नाही का? सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलण्यासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले की, निवडणुकीला 5-7 महिने राहिले की, काही लोकांची भाषणे ही ठरलेली आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत. पण कोण तोडणार आहे? जिथे विषयच नाही तिथे काही तरी लोकांच्या, जनतेच्या मनात नसलेले प्रश्न आणायचे, त्या विचारातून आपल्याला मते मिळत आहेत का? हा विचार करायचा, असा टोला सामंतांनी लगावला.
कुठेही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नाही. हा विचार ना केंद्र सरकार करत आहे, ना राज्य सरकार करत आहे. ते जसे महाराष्ट्रात राहतात, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रापासून मुंबई कोणाला नक्की बाजूला करायची आहे? कदाचित हे सारखे बोलून याच लोकांचा हा डाव आहे का? असा आरोप करत उदय सामंत म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईसाठी जे करायचे असेल ते करण्याची शासनाची आणि केंद्राची तयारी आहे, असे उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, असे हे वारंवार म्हणतात. पण हे सांगायची गरज काय? कारण मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडणार नाही. हा विषयच होऊ शकत नाही. मुंबई ही आमची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राचीच आहे, त्यामुळे असे कोणीही सांगायची गरज नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे सांगून भावनिक साद घालण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे, असेही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.