बाळासाहेबांच्या भूमिकेनुसारच शिवसेना आता युती करणार, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि ठराव या बैठकीत मांडण्यात आले. कार्यकारिणी बैठक पार पडल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे मुख्यनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या काळात शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या उद्दीष्टानुसार युतीबाबतचा निर्णय यापुढे घेतला जाणार आहे, असं उदय सामंत म्हणाले.

शिवसेना स्थापन झाल्यानंतर अनेक कामं पुढे घेऊन जाण्यात आली. या शिवसेनेने कोणासोबत युती करावी आणि कोणाबरोबर करू नये. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. याचं उद्दिष्टानं बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला. त्याचं समर्थन ४० आमदार, १० अपक्ष आमदार, १३ खासदार यांनी केलं. तसेच तो विचार टिकवण्यासाठी कुणीही कमी पडता कामा नये, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली, असं उदय सामंत म्हणाले.

अनेक ठराव संमत झाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने नियमावली घालून दिली आहे. त्या नियमावलीचं तंतोतंत पालन हे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी करावं, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुख नाव देण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. प्राचीन इतिहास असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता प्रयत्न करणार असल्याचंही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारणीला संबोधित केलं आहे. तसेच कोणाच्याही संपत्तीवर आणि मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच वि.दा. सावरकर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा, असा ठरावही मांडण्यात आल्याचं सामंत म्हणाले.


हेही वाचा : ठरलं! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब