छत्रपती संभाजीनगर : अद्यापही राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत. साधारणतः याचवर्षी या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राजकीय पक्ष वैयक्तिरीत्या कामाला लागले आहेत. अशातच आज शुक्रवारी (ता. 11 जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा केली.
खासदार संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत मोठा स्फोट झालेला असतानाच दुसरीकडे मात्र महायुतीला आयते कोलीत मिळाले आहे. ठाकरे गटाच्या या निर्णयाबाबत आता महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मत व्यक्त केले असून ठाकरे गटाने स्वबळाचा निर्णय का घेतला असावा, याचे कारण सांगत टोला लगावला आहे. (Uday Samant criticism of Sanjay Raut announcement of contesting elections on his own)
मंत्री उदय सामंत यांना प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत केलेल्या स्वबळाच्या घोषणेबाबत विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीत नेमके काय सुरू आहे, हे जसे प्रसार माध्यमांना कळत नाही, तसेत ते मतदारांना सुद्धा कळत नाहीये. 2019 ला शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना ते दुसऱ्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणे, म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भविष्यात हाताचा प्रचार शिवसेनेकडून कधीही होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांचा प्रचार करणे. भाषणात हिंदूह्रदयसम्राट शब्द न वापरणे, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल,असा टोला मंत्री सामंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा… मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार – राऊत
तसेच, ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहीत. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील, अशी कोपरखळी मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. तर यामुळे मविआला अपेक्षित यश मिळेल का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, 15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट उत्तर सामंतांकडून देण्यात आले. तसेच, पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना (ठाकरे गट) नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचे प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे? असेही मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाबाबत मत व्यक्त केले आहे.
संजय राऊतांचं विधान काय?
“मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.