उदय सामंत शिंदे गटात सामील, उद्या मांडणार भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा देणारे शिवसेना नेते आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही गुवाहटीला पोहचले असून शिंदेगटात सामील झाल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापले आहे. शिंदे यांनी त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. याचदरम्यान कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा देणारे शिवसेना नेते आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही गुवाहटीला पोहचले असून शिंदेगटात सामील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवसेनेचे उरले सुरले अवसानही गळून पडले असून शिंदे गट मात्र सक्रिय झाला आहे.

गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या शिंदेबंडाला रोज नवीन वळण मिळत आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत दिसणारे आमदार अचानक नॉट रिचेबल होऊन काही तासानंतर थेट गुवाहटीतील हॉटेलमध्ये शिंदेगटाबरोबर दिसत आहेत. यामुळे शिवसैनिकांबरोबरच सामान्य नागरिकही संभ्रमात पडले आहेत. हे नक्की काय सुरू आहे हाच एकमेव सवाल सध्या सगळ्यांना पडला आहे. उदय सामंत हे देखील काल शनिवारी शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते. पण आज सकाळी त्यांचा फोन लागत नव्हता. यामुळे उदय सामंत नॉट रिचेबल असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली. त्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यांसह नगरसेवकांनीही सामंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण सामंत नॉट रिचेबलच होते. यामुळे सामंतही गुवाहटीलाच गेले असावे असा अंदाच लावण्यात आला. पण दुपारी सामंत फ्लाईटमधून सूरत आणि सूरतमार्गे गुवाहटीत पोहचल्याचे फोटो व्हायरल झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.