मुंबई : मंत्री उदय सामंत यांच्याकडून ऑपरेशन ‘धनुष्यबाण’ आणि ऑपरेशन ‘टायगर’ची घोषणा होताच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या पक्षात नवा ‘उदय’ होणार म्हणून एकच धुरळा उडवून दिला आहे. उदय सामंत हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार फोडतील, असा दावाही राऊतांकडून केला जात आहे. त्यासह राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असं म्हणत उदय सामंत यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला आहे. यावरून उदय सामंत यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.
हे बालिश चाळे आहेत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी लोक आहोत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : छावा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकावे, नजरचुकीनं जर…; उदय सामंतांनी स्पष्ट केली भूमिका
सामंत म्हणाले, “‘उदय’चा विषय आठ दिवस झाले शिळा झाला आहे. मी आणि दादासाहेब भुसे ‘बाळासाहेब भवन’ येथे जनता दरबार घेण्यासाठी रोज बसतो. आम्ही देखील ठरवून घेणार आहोत की आल्या-आल्या रोज सकाळी ब्रेकिंग देऊन टाकायची. रोज सांगायचे की, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील वीस आमदार इकडे आहेत, खासदार तिकडे आहेत.”
“परंतु, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहोत. हे बालीश चाळे आहेत. अशी चाळे आम्ही 11 वीत करत होतो. उद्यापासून आम्ही ब्रेकिंग द्यायला सुरू करू,” असा टोला सामंतांनी राऊतांना लगावला आहे.
राऊत आज काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे यांच्या गटात नवा उदय होणार आहे. मला कुणाचे नाव घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपला ही पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, देशभरात हाच प्रकार सुरू आहे. चंद्राबाबूंचा पक्षही तोडला जाईल. नितीश कुमारयांचा पक्षही तोडला जाईल. त्यांच्या दाताला, जिभेला रक्त लागलं आहे. ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण सुरू राहील,” असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.
हेही वाचा : धाराशिवमध्ये ऑपरेशन ‘टायगर’, ठाकरेंचे खासदार अन् आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर?