‘नैना’तील इमारतींच्या पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवणार, उदय सामंत यांची मोठी घोषणा

Maharashtra Winter Session 2022 | २०१३ पासून नैना प्राधिकरणाने गावठाण अंतर्गत कोणत्याही गावांचा विकास केला नाही, ग्रामपंचायत हद्दीतील अनेक इमारती मोडकळीस आल्याने धोकादायक बनल्या आहेत, इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे आदी विविध मुद्द्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेध मांडली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असे जाहीर केले.

uday samant

Maharashtra Winter Session 2022 | नागपूर – नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातील (नैना प्रकल्प) इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. पुनर्विकासाठी एफएसआय वाढवून दिला जात नसल्याने विकासक पुढे येत नसल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधासनभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. एफएसआय वाढवून दिल्याशिवाय येथील इमारतींचा पुनर्विकास होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असं उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा मविआच्या नेत्यांकडून अविश्वास प्रस्ताव, पण अजित पवार अनभिज्ञ; नेमकं प्रकरण काय?

२०१३ पासून नैना प्राधिकरणाने गावठाण अंतर्गत कोणत्याही गावांचा विकास केला नाही, ग्रामपंचायत हद्दीतील अनेक इमारती मोडकळीस आल्याने धोकादायक बनल्या आहेत, इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे आदी विविध मुद्द्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेध मांडली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेऊ असे जाहीर केले.

‘काही ठिकाणी ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यामुळे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता येथील विकासासाठी धोरण निश्चित करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने याबाबत अद्याप धोरण तयार झालेलं नाही. पायाभूत सुविधा कोणी द्यायच्या, स्वराज्य संस्थाकडून द्यायच्या की राज्य सरकारकडून याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. पेण, उरण आणि पनवेलचा डेव्हलोपमेंट प्लान तयार करण्यासाठीही धोरण निश्चित करावं लागेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा – मुंबईतील आदिवासी पाड्यांबाबत विधानसभेत चर्चा, गावित म्हणतात जानेवारीत दौरा करू!

काही दिवसांपूर्वी अतिधोकादायक इमारतीतील स्लॅब कोसळल्याने एका १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्न केले जाताली, असंही उदय सामंत म्हणाले.

नैना प्राधिकारण क्षेत्राचा विकास वेगाने होतोय. मात्र, त्यासाठीच्या उपाययोजना कूर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे या संदर्भातील बैठक लागणार असेल तर तो किती कालावधीत लागेल असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारला. कारण, या बैठकीत नैनाच्या क्षेत्रातील सर्व आमदारांना त्यांचे विषय मांडता येईल. २०१३ पासून नैनाचा विकास थांबला आहे, त्यामुळे बैठक घेण्याची आवश्यकता आहे, असं ठाकूर म्हणाले. यावर उदय सामंत म्हणाले की, नवीन वर्षांत रागयडमधील पहिला दौरा सिडकोच्या कार्यालयात असेल. यामध्ये सर्वांना बोलावलं जाईल. नैनाच्या नादुरुस्त इमारतींचा स्ट्रक्लचर ऑडिट करून त्यांचा विकास करण्याचं धोरण ठरवलं जाईल.

सिडको अंतर्गत नैना प्राधिकरणाच्या हद्दीत गावठाणात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या बऱ्याच इमारतीत धोकादायक झाल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास होणं आवश्यक आहे. एफएसआय एकच असल्याने विकासक पुढे येत नाही. त्यामुळे सिडकोने शासनाने २८ फेब्रुवारी २०२२ ला विकास नियंत्रण नियमावलीनुसार पाठवलेल्या प्रस्तावाल शासन मंजुरी देणार का असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

हा प्रस्ताव संचालक, नगररचनाकार यांच्याकडे प्रलंबित आहे. येत्या ३० ते ६० दिवसांत हा प्रस्ताव सकारात्मकदृष्ट्या मंजूर करण्याकरता शासन प्रयत्न करण्यात येईल. एफएसआय वाढवत नाही तोपर्यंत गृहनिर्माण संस्था विकासक घेऊन घरे बांधू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याबाबतही निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं.